सोलापूर : येथे रविवारपासून (दि. १५) दुकाने, हॉटेल्स सकाळी ७ ते रात्री १० या वेळात सुरू ठेवण्यास महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी परवानगी दिली आहे. लग्नासाठी पन्नास टक्के उपस्थितीचे बंधन कायम असून, मॉल्समध्ये प्रवेश करणाऱ्यांना मात्र दोन्ही लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्य शासनाने बंधने शिथिल करण्याचे आदेश जारी केल्यानंतर सोलापूर शहरातील दुकाने रविवारपासून खुली होणार हे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबतचा आदेश शुक्रवारी सायंकाळी जारी केला. यामध्ये खुली व बंदिस्त उपाहारगृहांना ५० टक्के उपस्थितीच्या अटीवर सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. पार्सलसेवा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. पण हॉटेल सुरू करताना सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
लसीकरण झालेल्या नागरिकांना बाहेरील राज्यातून सोलापूर प्रवेशाला आरटीपीसीआर चाचणीची गरज नसेल. अन्य प्रवाशांना मात्र ७२ तासांपूर्वीची चाचणी निगेटिव्ह किंवा १४ दिवस अलगीकरण आवश्यक राहील. यासाठी रेल्वे व बसस्थानकावर आरोग्य विभागाची पथके नियुक्त करून प्रवाशांची तपासणी करण्यात येईल. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक राहील. तपासणीत नियमांचे उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
-----
काय बंद.. काय चालू..
- उपहारगृहे : ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू.
- दुकाने : सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू.
- शॉपिंग मॉल : सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत सुरू.
- जिम, सलून, योग, स्पा : ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत सुरू.
- इनडोअर स्पोर्ट्स : मर्यादित खेळाडूंना मुभा
- कार्यालय : सर्व शासकीय, निमशासकीय, बँक पूर्ण क्षमतेने सुरू.
- खासगी आस्थापना : २५ टक्के कर्मचारी, २४ तास परवानगी, होमवर्कला प्राधान्य.
- विवाह सोहळे : ५० टक्के उपस्थिती, खुले लॉन फक्त २०० व्यक्ती.
- सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह : बंदच
- धार्मिक स्थळे : बंदच
------
कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक
दुकाने, हॉटेल व कार्यालयांना मुभा देण्यात आली असली तरी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले बंधनकारक असणार आहे. लग्नकार्याचे व्हिडिओ शुटिंग केले जाईल. नियम माेडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
------
‘लोकमत’ला दिले धन्यवाद...
सोलापुरातील निर्बंध रविवारपासून खुले होणार याचे वृत्त ‘लोकमत’ने शुक्रवारच्या ‘हॅलो सोलापूर’मध्ये ठळकपणे प्रसिद्ध केले होते. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी या वृत्ताचे स्वागत केले व ‘लोकमत’ कार्यालयास दूरध्वनी करून आभारही व्यक्त केले.