सोलापूर : पवित्र रमजान महिन्यात सर्वाधिक मागणी असलेली ड्रायफ्रूटची दुकाने आजपासून थाटायला सुरूवात झाली आहे़ येथील बाजारपेठेत हैदराबाद येथील ड्रायफ्रूट दाखल झाले आहेत. विलायची वगळता इतर पदार्थांचे दर हे मागील वर्षाच्या तुलनेत स्थिर आहेत.
जूनच्या पहिल्या आठवड्यात रमजान ईद साजरी होत आहे़ ईदनिमित्त घरोघरी शिरखुर्मा केला जातो़ यासाठी दूध, ड्रायफ्रूट वापरले जातात तसेच उपवासाच्या इतर पदार्थांसाठी लागणारा गरम मसालाही येथील बाजारपेठेत दाखल झाला आहे़ हैदराबादमधील बेगम बझार येथून सारे ड्रायफ्रूट येथील बाजारपेठेत दाखल झाले आहेत़ शहरातील बहुतांश व्यापारी रमजाननिमित्त अनेक वर्षांपासून हे साहित्य बेगम बझार येथून मागवितात़ मागील २० ते ३० वर्षांपासून या वस्तू हैदराबादमधून येतात.
ड्रायफ्रूटचे व गरम मसाल्यांचे किलोमध्ये दर
- - काजू - ९०० रु़
- - बदाम - ८०० रु़
- - मनुके - ३०० रु़
- - चारोळी - ९०० रु़
- - आक्रोड - ९०० रु ़
- - पिस्ता - ११०० रु ़
- - खजूर - २०० रु़
- - शेवई - ७० रु़
- - खोबरे - २२० रु़
- - तीळ - १६० रु़
- - धने - १०० रु़
- - दालचिनी - ३०० रु़
- - लवंग - ६५० रु़
- - शहाजिरे - ६०० रु़
- - काळीमिरे - ६०० रु़
- - सूंठ - ३०० रु़
- - खसखस - ६५०० रु़
- - जिरे - २०० रु़
- - मोहरी - ७० रु़
- - हळकुंड १२० रु
विलायचीचा दर भडकला- यंदा प्रथमच विलायचीचा दर भडकलेला आहे. मागील वर्षी विलायचीचा दर हा २२०० ते २५०० रुपये होता. यंदा हा दर चक्क ३५०० रुपयांवर पोहोचला आहे़ हैदराबाद आणि पुणे शहरातून हा माल येतो़ त्या ठिकाणी पाण्याअभावी याचे उत्पादन यंदा कमी असल्याने दरवाढ झाल्याचे व्यंकटेश कोळा या ड्रायफ्रूट विक्रेत्याने सांगितले़ या विलायचीमध्येही चार प्रकार पाहायला मिळतात़
यंदा प्रथमच विलायचीचा वाढलेला दर अनुभवतोय़ बाजारपेठेत याचा तुटवडाही आहे़ आजपासून सर्व साहित्याच्या खरेदीला सुरूवात होत आहे़ शहरात जवळपास ५० हून अधिक व्यापाºयांनी ड्रायफ्रूटची दुकाने थाटली आहेत़ - व्यंकटेश कोळा, ड्रायफ्रूट व्यावसायिक