सोलापूर: माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे वक्तव्य सत्तेसाठीच आहे, असा आरोप माळशिरस तालुक्यातील चांदापुरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तम जानकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून ते विधानसभा निवडणुका होईपर्यंत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपचेच काम केले. पण आता विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील भाजपची सत्ता गेल्यानंतर मी आणखीन राष्ट्रवादीतच आहे असे विधान केले आहे. त्यांच्या विधानाने माळशिरस तालुक्याची इज्जत गेली आहे. विजयदादांचे नेतृत्व आता संपल्यातच जमा आहे. बुधवारी पुणे येथे त्यांनी हे विधान केल्यानंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
जानकर यांनी विजयदादांचे हे वक्तव्य अतिशय केविलवाणे आहे असे यावेळी म्हटले आहे. त्यांचा मुलगा भाजपात जातो, त्यांचे भाऊ मागे फरफटत आहेत. या सगळ्या घडामोडीमुळे त्यांच्या कुटुंबातच ताळमेळ नाही असे चित्र दिसत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात इतके दिवस राजकारण करणाºया विजयदादांकडे एकही सकारात्मक गुण नाही, अशी टीका जानकर यांनी केली. विजयदादांकडे कर्तृत्व, इच्छा, तळमळ असे कोणतेही गुण दिसत नाहीत. तरीही त्यांनी इतके दिवस जिल्ह्यावर राज्य केले आहे. अशा ज्येष्ठ नेत्याने आता पुन्हा अशा प्रकारचे वक्तव्य करायला नको होते असे आपले ठाम मत असल्याचे जानकर यांनी सांगितले. विजयदादांनी भाजपत प्रवेश केला काय किंवा न केला काय? दोन्ही निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांची तयारी तर त्यांनीच केली होती. त्यावेळीही ते सत्तेसाठीच भाजपचे काम करीत होते आणि आताही त्यांनी केलेले वक्तव्य सत्तेसाठीच आहे असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमचा उमेदवार द्यावा ! झेडपीत सत्ता स्थापनेबाबत महाविकास आघाडीची आज बैठक झाली. त्या बैठकीलाही जानकर यांनी हजेरी लावली. या ठिकाणी मत व्यक्त करताना माळशिरस तालुक्यात निवडणुका लढविताना आमचा सातत्याने पराभव होत आहे. माळशिरस तालुक्यात आमचे नेतृत्व उभे राहण्यासाठी अध्यक्षपदासाठी आमचा उमेदवार द्यावा अशी मागणी केली. आपले संख्याबळ जमले आहे म्हणून भ्रमात राहू नका, सगळ्या सदस्यांना एकत्रितपणे सुरक्षित जागी हलवा, दुसºया बाजूनेही जोरात प्रयत्न सुरू असल्याचे जानकर यांनी निदर्शनाला आणले.