मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची काळजी वाटत असल्याचं विधान केलं आहे. नितीन गडकरी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी चर्चिलं जात असल्यामुळं मला त्यांची काळजी वाटते, असे पवार यांनी म्हटले. पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तो त्यांच्या या वक्तव्यावर अनेकजण आप-आपले तर्क जोडत आहेत.
गडकरी माझे मित्र आहेत, विधिमंडळात ते माझ्यासोबत होते. मात्र, आता त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात असल्यामुळं मला त्यांची काळजी वाटते, असे शरद पवार यांनी म्हटलंय. पवारांच्या या विधानाचा नेमका रोख कशाकडे होता, याबाबत राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. केद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरींच्या कामाची सध्या देशभर चर्चा होत आहे. आपल्या बेधडक आणि स्पष्ट स्वभावामुळे त्यांची लोकप्रियताही वाढत आहे. त्यातच, एक जबाबदार आणि शब्दाचा पक्का नेता म्हणून त्यांची प्रतिमा माध्यमात आहे. तर, नुकतंच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही गडकरींच्या कामाचं बाक वाजवून कौतुक केलं होतं. तसेच राहुल गांधींशीही त्यांची जवळीक 26 जानेवारीच्या कार्यक्रमात दिसून आली. दरम्यान, सन 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केंद्रात सत्ता भाजपाचीच येणार; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हे, तर नितीन गडकरी बनणार असल्याची भविष्यवाणी अमरावती येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ज्योतिष परिषदेत ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी केली. त्यामुळे नितीन गडकरी यांचं नाव चांगलच चर्चेत आलं आहे.