सोलापूर - राज्यात शिवसेनेनं भाजपची साथ सोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीची स्थापन केली. त्यामुळे, राज्याच्या राजकारणाची गणितं बिघडली आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या खेळीने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष सत्तेत आले. मात्र, सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. मात्र, स्थानिक पातळवर महाविकास आघाडीतून गुंता झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर भाजप-शिवसेना नेते एकत्र असल्याने त्यांची गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोलापूच्या सांगोल्यातील शिवसेना नेते आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विधानामुळे पुन्हा स्थानिक वाद समोर आला आहे.
शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, तालुक्यात शिवसेनेची केवळ 1100 मते असूनही मी आमदार झालो, कारण माझ्या विजयात भाजपची मोलाची साथ लाभल्याचे ते सांगतात. तसेच, खासदार रणजित निंबाळकर यांच्यामुळे पुन्हा आपल्याला आमदारकी मिळाली. या निवडणुकीत भाजपचे माझ्यावर 24 तास लक्ष होते. सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन यायचे असे शहाजीबापू यांनी सांगितले.
सांगोल्यात तब्बल 18 वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना यंदा भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे गुपित शहाजीबापू यांनी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात उघड केले. विशेष म्हणजे सांगोला हा दिवंगत शेकाप नेते गणपतराव देशमुख यांचा मतदारसंघ होता. यंदाच्या निवडणुकीत ते स्वत: उमेदवार नव्हते. मात्र, त्यांनी दिलेल्या उमेदवाराच पराभव करत शहाजी पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे विजयानंतर शिवसेनेकडून गप्प बसा अशी तंबी देण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.