सोलापूर : आषाढी वारीच्या निमित्तानं मी पंढरपुरात जाणार आहे. पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेणार आहे, मात्र कोणत्याही परिस्थितीत राजकीय बोलणार नसल्याचे स्पष्टीकरण तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते साेमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोलापुरात दाखल झाले. त्यांच्यासोबत तेलंगणाचे मंत्री, खासदार, आमदार अशा ३०० गाड्यांसह ६०० हून अधिक लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. सोलापुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे माजी खासदार धर्मण्णा सादूल यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीत त्यांनी विविध विषयावर चर्चा केली. चर्चेनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी सांगितले की, पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलो आहे, दर्शन घेणार आहे मात्र राजकीय काही बोलणार नाही असे सांगितले. महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीविषयी के. चंद्रशेखर राव यांना विचारले असता त्यांनी बोलण्याचे टाळले. यावेळी त्यांच्यासमवेत तेलंगणाचे मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते.