राजकुमार सारोळे । सोलापूर: शहराच्या गावठाणातील महत्त्वाचा भाग पत्रा तालीम. स्वातंत्र्य काळातील चळवळीच्या आठवणी देणाºया वास्तू व स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा. एक काळ असा होता की पत्रा तालीम असे नाव घेतले की लोक वेगळ्या नजरेने पाहायचे. पण समज, गैरसमज दूर सारून या भागातील नागरिकांनी पुढाकार घेत सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम नेटाने केले. यातून या परिसरात नामवंत मल्लांसह डॉक्टर, वकील, प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक घडले व देशाच्या कानाकोपºयात ते या भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
पत्रा तालीमचा इतिहास जुना आहे. जुनी मिलमध्ये काम करणारे कामगार या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास होते. हे सर्व लोक मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ परिसरातून वास्तव्यास आलेले होते. त्यामुळे येथील तरुणांसाठी मंगळवेढा तालीमची सुरुवात झाली. या तालीममध्ये पैलवान जास्त होऊ लागले म्हणून स्वा. सेनानी महादजी वस्ताद, जगन्नाथ परदेशी मास्तर यांनी पत्र्याचे शेड मारुन या तालीमची स्थापना केली. त्यामुळे या तालीमला पत्रा तालीम असे नाव रूढ झाले. या परिसरात सुमारे दहा हजार लोकवस्ती आहे. येथील समाजसेवकांच्या पुढाकाराने लोकमान्य मध्यवर्ती गणेशोत्सवाची स्थापना केली. त्याचबरोबर शिवजन्मोत्सवानिमित्त कुस्ती व इतर खेळांच्या स्पर्धा घेऊन तरुणाईला प्रोेत्साहन देण्याचे काम सुरू आहे. गावठाण भाग असल्याने स्मार्ट सिटी योजनेचा पाया यापूर्वीच या भागात घातला गेला आहे.
अगोदरच परिसर स्मार्ट- विहिरीवरून घरोघरी पाणीपुरवठा करण्याची योजना याच भागात साकारली गेली. डाळिंबी आडवरून परिसरात पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर नागबावडीवरून परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकली गेली. पण पुरातत्त्व खात्याची मंजुरी न मिळाल्याने अद्याप हा प्रयोग सुरू झालेला नाही. तसेच या भागात चकचकीत रस्ते करण्यात आले. स्ट्रीटलाईट दोन वर्षांपूर्वीच एलईडी बसविण्यात आले आहेत. अशाप्रकारे स्मार्ट सिटीचा पाया यापूर्वीच या भागात घातला गेला आहे. शहराला पाणी टंचाई निर्माण झाली तरी विहिरीवरून या भागाला पाणीपुरवठा करून समस्या सोडविली जाऊ शकते अशी पर्यायी यंत्रणा तयार आहे.
महापालिकेच्या राजकारणात प्रभाव- महापालिकेच्या राजकारणात पत्रा तालीमचा दबदबा राहिला. पुलोदच्या वेळेस कै. मुरलीधर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली २१ नगरसेवक निवडून आले व ते परिवहन चेअरमन झाले.पुरुषोत्तम परदेशी अर्थात मन्नी महाराज हे स्थायी सभापती झाले. शंकर धंगेकर, भीमराव होनपारखी, सुषमाताई घाडगे, जनाबाई कोलारकर, शांताबाई दुधाळ, कै. राजाभाऊ खराडे, भारत बन्ने, महेश गादेकर आणि पद्माकर काळे यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यामुळे या भागाचा कायापालट झाला.
कटाचा मारुती- पत्रा तालीम परिसरात थोरला मंगळवेढा पीर, चर्मकार समाज मंदिर, सळई मारुती मंदिर अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सळई मारुती मंदिरास कटाचा मारुती असे म्हटले जाते. १९६0 च्या क्रांतीची गोपनीय खलबते या मंदिरात शिजली म्हणून असे नाव रुढ झाले.
ए नाद नाय.... गुणवत्तेत आम्ही पुढेच- पत्रा तालीम परिसरातून अनेक गुणवंत घडले. त्यामध्ये साहेबराव गायकवाड (अपर जिल्हाधिकारी, सातारा), कार्यकारी अभियंता संजय सोलनकर, अॅड. महेश सोलनकर, अॅड. कै. जगदीश परदेशी, अॅड. हरिदास जाधव, सी.ए. युवराज राऊत, अभियंता अभिजित राऊत, तलाठी कै. सौदागर भोसले, वैशाली जमदाडे, डॉ. सचिन पुराणिक, डॉ. ईश्वरी घाडगे, डॉ. शाम चाबुकस्वार(अमेरिका), राजकीय कै. मुरलीधर घाडगे, पैलवान, सुषमा घाडगे, महेश गादेकर, पद्माकर काळे, ़श्रीकांत घाडगे, किरण पवार, राजन जाधव, अडत व्यापारी लक्ष्मण केत, रामचंद्र भोसले, जालिंदर जाधव, चांगदेव रोकडे, पांडुरंग शिंदे, दत्तात्रय कोलारकर यांचा समावेश असल्याचे देविदास घुले यांनी सांगितले.