विलास जळकोटकर
सोलापूर: झोपडपट्टी बोले तो गंदगी नही.. बहुत कुछ बदलाव हुआ है.. यहाँके लोग गरीब जरुर है मगर खुद्दार है.. एकसे बडे एक लोक उच्चशिक्षित हुए है.. कुछ चंद लोगोंके वास्ते शास्त्रीनगर बदनाम हुआ. आमच्यावर लावण्यात आलेला रेडमार्क दूर व्हावा, काळाबरोबर या वस्तीनं संशोधक, डॉक्टर, इंजिनिअर असे एक से एक हिरे दिले आहेत. आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. या उत्स्फूर्त भावना आहेत शास्त्रीनगरच्या हिंदू-मुस्लीमवासीयांच्या.
शहराच्या पूर्व दिशेला वसलेल्या शास्त्रीनगर भागाने काळाच्या ओघात आपल्यामध्ये अनेक बदल घडवले आहेत. एकेकाळी झोपडपट्टी म्हणून गणल्या गेलेल्या या परिसरानं कात टाकली आहे. शिक्षणाची गंगा इथे सताड वाहू लागली आहे. १२ हजारांहून अधिक लोक पदवीधर अन् उच्चशिक्षित होऊन विविध क्षेत्रात शास्त्रीनगरचे नाव रोशन करीत आहेत. जवळपास आठ-साडेआठ हजारांच्या घरात अंडर ग्रॅज्युएटची संख्या आहे. पूर्वीची स्थिती राहिलेली नाही. असे असताना या भागावर १९९२ पासून लागलेला रेडमार्क इथल्या लोकांच्या प्रगतीला खीळ देणारा ठरतो आहे. यातून सुटका कशी होणार, असा सवाल इथले युवा कार्यकर्ते सादिक कुरेशी, अस्लम कानकुर्ती, संशोधक, प्राचार्य गुलाम दस्तगीर शेख, जयकुमार काटवे, नागनाथ बडगू अशा असंख्य मोहल्लावासीयांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.
गरिबीतून अनेक संकटांवर मात करीत शास्त्रीनगरमध्ये मुस्लीम, पद्मशाली, कोंगारी, दलित, कुंभार, मोची अशी सर्व धर्माची मंडळी गेल्या कैक वर्षांपासून गुण्यागोविंदानं नांदताहेत. अनेकांनी घरामध्ये शिक्षणाचा गंध नसताना आपली मुले वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक अशी उच्च विद्याविभूषित केली. याच गल्लीत वाढलेली मुलं आज लंडनसह परदेशात आपला ठसा उमटवत आहेत. असं सारं काही असताना इथल्या नागरिकांना प्रगतीच्या वाटा शोधण्यासाठी विविध आर्थिक संस्थांकडे पतपुरवठ्यासाठी अर्ज करायचा म्हटलं तर आमच्या मागे लागलेला ‘रेडमार्क’ पुसता पुसला जात नाही. म्हणून आम्ही तरुण पिढीनं ‘शास्त्रीनगर क्या है’ या उपक्रमातून इथं झालेला सकारात्मक बदल पुढे आणण्यासाठी पाऊल उचलले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांना पाचारण केले आहे. त्यांच्या उपस्थितीत वस्तीतून मोठे होऊन समाजासाठी विशेष योगदान देणाºया मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे. यातून नक्कीच शास्त्रीनगरचा चेहरामोहरा, प्रतिमा बदलण्यास मदत होईल, अशी अपेक्षा डॉ. रफिक सय्यद यांच्यासह अनेक बुजुर्गांनी व्यक्त केली.
आधी खडकपुरा.. नंतर खणीपुरा.. पूर्वी हा परिसर खडकांनी व्यापलेला असल्याने खडकपुरा म्हणून ओळखला जायचा. पुढे इथे दगडांच्या खाणी असल्यानं खणीपूर म्हणून ओळखायला लागले. १९६५ च्या लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असतानाच्या काळात या भागातून आता जो मौलाली चौकापासूनच रोड आहे येथे फकिरांसह, गोरगरिबांची झोपडपट्टी होती. ती हटवली गेली. या लोकांना आता जे शास्त्रीनगर आहे तेथे पर्यायी जागा देण्यात आली. यावेळी या भागातील नेते, पीर अहमदसाब नदाफ यांनी लालबहादूर शास्त्री यांची प्रेरणा घेऊन या भागाला शास्त्रीनगर नाव दिले ते आजतागायत असल्याची माहिती प्राचार्य गुलाम दस्तगीर शेख यांनी दिली.
वसाहतीतील उच्चशिक्षित हिरे- या वस्तीनं गेल्या अनेक वर्षात समाजासाठी उच्चशिक्षित हिरे दिले आहेत. यात कॅन्सरतज्ज्ञ डॉ. फहीम गोलीवाले श्रावणी रमेश आडसूळ लंडनमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. रविकुमार कटकधोंड (आयएएस), परवेझ दफेदार (विस्तार अधिकारी), वाहिद झारी (विक्रीकर अधिकारी), डॉ. मीर अकबर मीर (कवी), शहनाज बेग नाझ (कवयत्री), अॅड. आय. ए. खान अशी हजारो शास्त्रीनगरमधील बांधव समाजासाठी विविध क्षेत्रातील विकासासाठी योगदान देत आहेत.
कशासाठी नव्या पिढीसाठी- नव्या पिढीत अनेक बदल होताहेत. विविध क्षेत्रात त्यांनी गरुडभरारी घेतली आहे. या पिढीला शास्त्रीनगरला दिलेला रेडमार्क अडसर ठरु नये, यासाठी समाजाला शास्त्रीनगरनं काय दिलं हे दाखवण्यासाठी सर्व समाजातील बांधव एकत्र आल्याचे सांगण्यात आले.