सोलापूर : शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीही माढ्यातून लढण्यास एकप्रकारे नकार दर्शवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना, त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना, 'मी असं म्हणलेलोच नाय की, मी इथून लढणार म्हणून'... असे म्हणत माढ्यातून उमेदवारी न लढविण्याचे संकेतच देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे पवारांनंतर आता देशमुखांनीही माढ्यातून काढता पाय घेतल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर, सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता, पवारांनंतर माढ्यात कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर, मोहिते पाटील घराण्यातही येथील उमेदवारीवरुन रणकंदन माजले आहे. पवारांनी, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांना सांगितले की, ‘मी उभारणार नाही. तुमच्यासाठी माढा सोडतोय.’ तेव्हा विजयदादा म्हणाले, ‘मला नको, रणजितदादांना उमेदवारी द्या.’ त्यानंतर रामराजे, बबनदादा, रश्मीदीदी अन् जयकुमार यांनी नव्या नावाला कडाडून विरोध केल्यामुळे उमेदवारीची घोषणा लटकली. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर रणजितदादांनी थेट मुंबई गाठली अन् जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात फोडाफोडीची चर्चा रंगली आहे.
माढामधून उमेदवारी मिळावी, यासाठी भाजप पुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीही वर्षा बंगल्यावर जाऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे भाजपाचा माढ्यातील उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच, सुभाष देशमुख यांनीही मी माढ्यातून निवडणूक लढविणार असे कधीच बोललो नव्हतो, असे म्हणत माढा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानातून यु-टर्न घेतला आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील उत्सुकता अधिकच वाढली असून राजकीय वर्तुळाच चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, 2009 साली सुभाष देशमुख यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध भाजपाकडून निवडणूक लढवली होती.