सोलापूर : पक्ष्यांप्रमाणे माझे स्थलांतर विदर्भात झाले होते. पण पक्ष्यांना आपल्या मूळ वसतिस्थानाचे आकर्षण असते, त्याप्रमाणे मी सोलापूरला आलो. यापुढे माझ्या जन्मगावी राहण्यातच मला आनंद आहे, असे ते म्हणाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मारुती चितमपल्ली यांनी पक्ष्यांप्रमाणे माझे स्थलांतर विदर्भात झाले होते. पण पक्ष्यांना आपल्या मूळ वसतिस्थानाचे आकर्षण असते, त्याप्रमाणे मी सोलापूरला आलो. यापुढे माझ्या जन्मगावी राहण्यातच मला आनंद आहे, असे मत वनऋषी मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी एक लाख नव्या शब्दांची भर घालणारे वनऋषी मारुती चितमपल्ली यांच्या नावे वनविभागाच्या वतीने सिद्धेश्वर वनविहार येथील निसर्गरम्य परिसरात‘अरण्यऋषी कक्ष’ स्थापन करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने यंदा जाहीर केलेल्या पक्षीसप्ताह आणि त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून त्या कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य संरक्षक पुण्याचे सुजय दोडल, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, सहायक वनसंरक्षक हाके, वनक्षेत्रपाल कल्याणराव साबळे, रमेशकुमार वनसंरक्षक पुणे, वनपाल चेतन नलावडे यांच्यासह डॉ. निनाद शहा, डॉ. व्यंकटेश मेतन, डॉ. सुहास पुजारी, पद्माकर कुलकर्णी, गिरीश दुनाखे, भरत छेडा, पप्पू जमादार हे वन्यजीवप्रेमी उपस्थित होते.
सोलापूर हे जन्मगाव असले तरी आपले संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जंगलात घालवून ते विदर्भात स्थायिक झाले होते. उर्वरित काळ सोलापुरात घालविण्यासाठी ते शहरात आले असून, पहिल्यांदाच एखाद्या जाहीर कार्यक्रमास उपस्थित झाले होते. वृक्षकोषाचे लेखन वनविहारातल्या या निसर्गरम्य परिसरातील या कक्षात बसून पूर्ण करावे, अशी भावनिक हाक उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
या कक्षात चितमपल्लींचे मौल्यवान लेखन पुस्तकरूपाने जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या पक्ष्यांचे संग्रह, पक्षीकोष, शब्दाचे धन यांसह अनेक पुस्तकांच्या मुखपृष्ठाच्या प्रतिकृतींनी आणि पुस्तकांनी सजविण्यात आले. त्यांच्यासाठी खास बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांचे या कक्षात आगमन होताच स्वप्नाली चालुक्य, प्राजक्ता नागटिळक, सुवर्णा माने, संध्या बंडगर यांनी औक्षण करून स्वागत केले.
वनविभागाच्या वतीने आयोजित वनसेवक संजय भोईटे यांच्या विविध पक्ष्यांच्या पिसांच्या आणि छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट देऊन मारुती चितमपल्ली यांनी पाहणी केली. भरत छेडा व पप्पू जमादार या वन्यजीवप्रेमींच्या वतीने त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित विविध फळे आणि पानांचा भव्य केक तयार करण्यात आला होता. त्यातील काही फळांचे प्रातिनिधिक सेवन चितमपल्लींनी करून वाढदिवस साजरा केला. सूत्रसंचालन चेतन नलावडे यांनी केले तर कल्याणराव साबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास इर्शाद शेख, प्रकाश डोंगरे, वनरक्षक शुभांगी कोरे, अनिता शिंदे, यशोदा आदलिंगे, बापूसाहेब भोई, गोवर्धन व्हरकटे, गंगाधर विभूते, तुकाराम बादणे, संदीप मेंगाळ, पक्षीमित्र प्रशांत पाटील, सतीश जाधव, नागेश राव, आयुब पत्तेवाले, रेवती धाराशिवकर आदी वन्यजीवप्रेमी उपस्थित होते.
व्हीलचेअरवर बसूनच संपूर्ण कार्यक्रमास हजेरी लावली
महाराष्ट्र शासनाच्या वतीने यंदापासून पाच नोव्हेंबर चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि बारा नोव्हेंबर सलीम अली यांची जयंती असा पक्षीसप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त येथील सिद्धेश्वर वनविहार येथे आयोजित कार्यक्रमात चितमपल्ली सहभागी झाले. प्रकृतीची समस्या असूनसुद्धा त्यांचा उत्साह दांडगा होता. कार्यक्रमस्थळी आल्यावर ते आपले पुतणे श्रीकांत आणि भुजंग यांच्या मदतीने कक्ष उद्घाटन करण्यास चालत आले. त्यानंतर मात्र त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच संपूर्ण कार्यक्रमास हजेरी लावली आणि वृक्षारोपणही केले. त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त विविध फळांनी तयार केलेले नव्वद आकड्याच्या आकाराचा केक एक आकर्षण होते. उपस्थित सर्व वन्यजीवप्रेमींना ते चाखायला मिळाले.