सोलापूर : उजनी धरणाचे पाणी इंदापूर आणि बारामतीला देण्याच्या प्रश्नावर आमदार शिंदे यांनी बुधवारी शासकीय विश्रामगृहावर माध्यमांपुढे भूमिका स्पष्ट केली. सोलापूरचे पाणी पळविण्याचा प्रयत्न केला तर रान पेटवू, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी सरकारला दिला आहे. मला सत्तेशी काहीही देणेघेणे नाही. मी लहानपणापासून सत्ता पाहिली आहे. सोलापूरकरांचे पाणी वळवत असाल तर खबरदार आम्ही रान पेटवल्याशिवाय राहणार नाही. आम्हांला पाणी द्या, रोज पाणी द्या आणि आमच्या पाण्याला हात लावू नका, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी सरकारच्या निर्णयावर माध्यमांसमाेर मांडली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आलेल्या एका बैठकीसाठी आ. प्रणिती शिंदे आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत मनपाचे गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अन्य काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, उजनीचे पाणी २० वर्षांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी पाईपलाईनद्वारे सोलापूरला आणले. आत्ता उजनी प्लस असूनही महापालिकेतून याचे नियोजन होत नाही. काँग्रेस सत्तेत असताना दुष्काळातसुध्दा दोन दिवसाआड सोलापूरला पाणी मिळत होते. तेव्हा उजनी मायनसमध्ये होते तरीही पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.
पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना एका रात्रीत दाेन कोटी रुपये खर्च करुन सक्शन पंप लावून एका रात्रीत पाणी आणले. दुष्काळ पडल्यानंतर देखील आम्ही हद्दवाढ भागातही दोन दिवसाआड पाणी देण्याचा प्रयत्न केला. आत उजनी प्लसमध्ये असतानासुद्धा पाणी दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही काय मेलो का?
----------
आम्हाला पाणी द्या नाहीतर...
मागील दोन वर्षांत चांगला पाऊस पडला. त्यामुळे उजनी धरण सध्या प्लसमध्ये आहे. तरीही उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन केले जात नाही. शहराला पाणीपुरवठा करतानाही नियोजनाचा अभाव दिसत आहे. आम्हाला पाणी द्या...आम्हाला पाणी द्या अन् आम्हाला रोज पाणी द्या, असा दमही आ. शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना भरला.