सोलापूर : व्हिएतनाममध्ये चिलापी माशांची पैदास मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे मासे गाळातील घाण खातात. तसेच त्यांची वाढ झपाट्याने होते, हे कळाल्यानंतर खास व्हिएतनाममधून आणलेले हे मासे मीच एकेकाळी उजनी धरणात सोडले होते, अशी आठवण राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितली.
वेळापूर येथे उत्तम जानकर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यासाठी शरद पवार शनिवारी सोलापूर जिल्ह्यात आले होते. हेलिपॅडवर हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांच्या गाडीत ते बसले. त्यांच्यासोबत आमदार यशवंत माने तसेच माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील हेही होते. विवाहस्थळी जाताना त्यांनी उपस्थितांसोबत उजनी धरणापासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी चिलापी माशांचा किस्सा सांगितला.