सोलापूर/ सांगोला : अजितदादा त्यांच्याबरोबर ४०-४५ आमदार घेऊन आमच्याकडे आले. त्यावेळी शरद पवार यांनाही तुम्ही या, काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे, असे सांगत होतो. पण ते आले नाहीत. ती त्यांची भूमिका होती. मात्र त्यांच्याबद्दल आदर असल्याचे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाचा चबुतरा बांधणे व सुशोभीकरण करणे कामाच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले गुरुवारी सांगोल्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, प्रा. पी.सी झपके, बाबुराव गायकवाड, भाऊसाहेब रुपनर, डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, माजी नगराध्यक्ष राणी माने, तानाजी पाटील,आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते आदी उपस्थित होते.
यावेळी रामदास आठवले पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा अलीकडच्या काळात राहिलेली दिसत नाही. आज सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांविरुद्ध आरोप- प्रत्यारोप करण्याचा प्रयत्न होतोय. मात्र निवडणुकीच्या वेळी राजकारणाच्या वाट्या जरी वेगळ्या असल्या तरी मनामध्ये कटुता न ठेवता आपली परंपरा जोपासली पाहिजे, असेही ते म्हणाले.