मुळेगावतांडा (ता. द. सोलापूर) येथे बंजारा समाज बांधवांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगताना माजी मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मात्र कानावर हात ठेवले. छगन भुजबळ यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले. न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली. आपल्यावरील आरोपाबाबत काय, या प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, त्याबाबत फक्त मुख्यमंत्री बोलतील, असे त्यांनी वारंवार सांगितले.
भटक्या-विमुक्तांच्या पंचवीस मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून, मुख्य सचिवासोबत त्यावर चर्चा झाली आहे. लवकरच मुख्यमंत्री बैठकीची वेळ देतील, असे त्यांनी सांगितले. १८७२ ला इंग्रज सरकारने बंजारा समाजासह काही जातींवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे. हा शिक्का पुसण्यासाठी भटक्या विमुक्त जातींना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप-सेना युती सरकारच्या काळात पोहरादेवी येथे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होत नाही याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. या मेळाव्याला माजी महापौर अलका राठोड, राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्याध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, आयोजक संदीप राठोड, सिनेअभिनेता सी. के. पवार, प्रा. भोजराज पवार, शैलजा राठोड, पांडुरंग राठोड, दगडू राठोड, बाळू पवार, आदी उपस्थित होते.
........
नाईक महामंडळाला निधी नाही
अत्यंत दुरवस्थेत जगणाऱ्या बंजारासह अन्य जाती-जमातींच्या उद्धारासाठी सरकारने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली. काही काळ या महामंडळाने चांगले काम केले. मात्र, अलीकडच्या काळात सरकारने महामंडळाला निधीची तरतूदच केली नाही. भटक्या विमुक्तांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत नाही, म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले.