सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) बी ब्लॉकच्या इमारतीत फेरबदल करून आयसीयू व सी ब्लॉकमध्येही बेड वाढविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणखी १०० बेडची व्यवस्था करण्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीतील व्यापक चर्चेनंतर नवीन बी ब्लॉकच्या इमारतीत थोडाफार बदल करून शंभर बेडची व्यवस्था होऊ शकते, असे बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार यांनी सांगितले. बैठकीतील चर्चेनंतर प्रत्यक्ष इमारतींच्या पाहणीसाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सर्व अधिकाºयांसह सिव्हिल हॉस्पिटलच्या नवीन बी आणि सी ब्लॉकला भेट दिली.
यावेळी महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढेले, कोरोना विभाग प्रमुख डॉ. प्रसाद, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बी ब्लॉकमध्ये इतर विभाग कार्यरत असल्याने कोविड हॉस्पिटलच्या नियमानुसार इमारतीत काय बदल करावा लागेल, याची माहिती घेतली. त्यावेळी अभियंता शेलार यांनी प्रवेशद्वार वेगळे करणे व इतर विभागाचा संपर्क बंद करण्यासाठी एका बाजूची भिंत पाडणे तर आतील भाग वेगळे करण्यासाठी नवीन पार्टिशन तयार करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात बैठक झाली.
जिल्हाधिकारी शंभरकर यांनी कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमधील बेडची संख्या वाढवणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संभाजी धोत्रे, उपायुक्त अजयसिंह पवार, डॉ. विठ्ठल धडके, डॉ. विद्या टिरणकर, डॉ. सुहास सरवदे, डॉ. अग्रवाल, डॉ. चिटणीस, डॉ. वरेरकर, डॉ. सुरेश कंदले उपस्थित होते.
२० बेडचे आयसीयूनवीन कोरोना वॉर्ड कशा पद्धतीचा असावा, यावर अधिष्ठाता डॉ. ठाकूर, डॉ. पुष्पा आगरवाल यांनी मते मांडली. तज्ज्ञ समितीच्या डॉ. शशिकला सांगळे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना वॉर्ड तयार करताना काळजी घ्यायला हवी, असे सांगितले. यानुसार बी ब्लॉकमध्ये २० बेड आयसीयू आणि ८० बेड आॅक्सिजन सुविधेने युक्त असतील, अशा पद्धतीने इमारतीत आवश्यक बदल करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी अभियंता शेलार यांना दिल्या. सी ब्लॉकची पाहणी करून तेथेही चांगला कोरोना वॉर्ड होऊ शकतो अशा पद्धतीने व्यवस्था करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
असे लागेल मनुष्यबळबी ब्लॉकमधील या नव्या वॉर्डासाठी पाचशे डॉक्टर, कर्मचारी, नर्स यांची आवश्यकता भासेल, असे डॉ. ऋत्विक जयकर यांनी सांगितले. यामध्ये १४० डॉक्टर, २४० नर्सेस आणि १८० सफाई कर्मचारी लागणार आहेत. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी असे नवीन कर्मचारी नियुक्त करण्यासाठी तत्काळ जाहिरात द्यावी, अशी सूचना केली.