सांगोला : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ शिवस्मारकाचे खोदकाम करीत असताना कोरीव शिवकालीन महादेवाची मूर्ती सापडली आहे. दरम्यान, शिवलिंगाची मूर्ती पाण्याने स्वच्छ करून त्याची पूजा करण्यात आली. शिवस्मारकराचे हे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यासाठी दानशुरांचेही हात पुढे येत असल्याचे सांगण्यात आले.
सांगोला नगरपरिषद व शिवप्रेमी मंडळाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासाठी युध्दपातळीवर काम सुरू आहे. शिवस्मारकासाठी खोदकाम सुरू असताना ८ फेब्रुवारी रोजी कोरीव मूर्ती सापडली. ही मूर्ती शिवकालीन असून, दीड फूट रुंद व दोन फूट उंचीची आहे. या मूर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज शिवलिंगाची पूजा करीत असल्याचे दिसून येते. या सांगोला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन उपस्थित होते.
यावेळी बापूसाहेब भाकरे, सोमेश यावलकर, भारत साळुंखे, सुशील अंकलगी, अभिजित मार्डे, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब भाकरे, रमेश जाधव, बिले, गोपाळ चोथे, आनंद घोंगडे, मनोज उकळे, राजू चांडोले, शैलेश घोंगडे, सज्जाद तांबोळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
शिवस्मारकासाठी १७ लाखांचा निधी - दरम्यान, सांगोला नगरपरिषदेकडून या नियोजित शिवस्मारकासाठी १७ लाख रुपये मंजूर झाले आहेत़ तसेच शिवस्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी साधारण ७० ते ७५ लाख रुपये खर्च येणार आहेत़ नगरपरिषदेकडील मंजूर निधी वजा होता उर्वरित खर्च शिवप्रेमी मंडळातर्फे दानशूर व्यक्तींच्या मदतीने करण्यात येणार आहे. लवकरच हे स्मारक पूर्ण होणार असल्याचा विश्वास अरविंद केदार यांनी दिला आहे.
त्याच ठिकाणी प्रतिष्ठापना करावी- ज्येष्ठ इतिहासकार प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या मते शिवस्मारकाच्या खोदकामात शिवलिंगाची मूर्ती सापडणे हा एक शुभसंकेत आहे़ ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, असे त्यांनी सुचविले आहे.