जिल्ह्याला धार्मिक स्थळांची पार्श्वभूमी मोठी. एकीकडं अक्कलकोट-गाणगापूर, दुसरीकडं पंढरपूर-तुळजापूर. मात्र दीड वर्षापासून देवळं बंद. देवाचं दर्शन दुर्मिळ..मात्र याच काळात ज्योतिषकार्य-कीर्तनकारांचा सोशल मीडियावर भलताच गाजावाजा सुरू झालेला. उंदरगावचा ‘मनीमामा’ उंदीर-मांजराचा लपाछपी खेळ खेळून दमला, भागला. अखेर ‘आत’ जाऊन बसला. रोज पेपरातून फोटोबिटू दिसू लागला. बार्शीच्या ‘शिवलीलाताई’ ही टीव्हीवरच्या ‘रिॲलिटी शो’मध्ये सतत झळकू लागल्या. त्या ‘बिगबॉस होणार का, याकडं साऱ्या जिल्ह्याचे लक्ष. मात्र इथल्या राजकारणातला खरा ‘बिगबॉस’ कोण ? याचं ‘सर्चिंग ऑपरेशन’ करण्याची वेळ आली..लगाव बत्ती...
‘इंद्रभवन’च्या राजकारणात कैक वर्षे ‘तात्या बोले...स्टँडिंग डुले’ अशी हुकुमती परिस्थिती. ‘घड्याळ’वाल्यांच्या स्थापनेनंतर ‘अकलूजकरां’नी शहराच्या राजकारणात प्रचंड लक्ष घातलं. त्यावेळी अकलूजमध्ये वॉर्ड किती हे त्यांना कदाचित आठवत नसेल; परंतु सोलापूरच्या गल्ली-बोळातला कार्यकर्ता त्यांना पाठ झालेला. तेव्हाच्या इलेक्शनमध्ये त्यांनी ‘त्रिपुरसुंदरी’तच मुक्काम ठोकलेला. पेट्यांवर-पेट्या फोडलेल्या. तरीही सत्ता काही आलीच नाही. मेंबर मंडळी डझनावर गेलीच नाही. ‘हात’वाल्यांचंच बोट धरून त्यांचे ‘निकंबे पैलवान’ अखेर ‘डेप्युटी मेयर’ बनले. घड्याळ्याच्या काट्याची झेप या पक्षाच्या पुढं कधी पोहोचलीच नाही.
आता पुन्हा एकदा ‘बारामतीकरां’नी उचल खाल्लीय. काहीही करून आपला ‘महापौर’ बसविण्यासाठी सारे ‘पैत्रे’ वापरण्याचा चंग ‘काका-पुतण्यां’नी बांधलाय. पूर्वभागात ‘महेशअण्णा’, उत्तर पट्ट्यात ‘आनंददादा’, मध्यमध्ये ‘तौफिकभाई’, पश्चिम एरियात ‘सपाटे-गादेकर-कोल्हे टीम’ मंत्रालयात बसून ‘अजितदादां’नी कागदोपत्री तरी गणित छान मांडलंय, पण प्रचाराचा मुख्य चेहरा कोण ? नेतृत्व नेमकं कुणाकडं ?...या मूळ प्रश्नातच घड्याळ्याचे काटे आपल्याच काट्यात अडकू लागलेत. हे कमी पडलं की काय म्हणून ‘भरणेमामा-संजयमामा’ ही जोडीही अधून-मधून ‘खिचडी’ बनवायला सोलापूर चक्कर मारायला आसुसलेली. तरीही ‘घड्याळ’वाल्यांना शुभेच्छा...लगाव बत्ती...
धनुष्यवाल्यांची अवस्था तर याहूनही विचित्र. पाऊण डझन मेंबर ‘बारामतीकरां’च्या तंबूत चाललेत म्हणून वरचे नेते अस्वस्थ, तर ‘महेशअण्णा’ गेले म्हणून जिल्हाप्रमुख रिलॅक्स. आपण कितीही ‘टणात्कार’ केले तरीही ‘विरोधी पक्ष’ हीच ओळख आपल्या पाचवीला पूजलेली. असा ठाम विश्वास.
कदाचित यांच्या बोलघेवड्या प्रमुखाला असावा. मात्र कोणत्याही ‘बंगल्या’शी आतून ॲडजेस्ट न होता त्यांनी नेहमीच्या आक्रमक भाषेत ‘भगवं वादळ’ निर्माण केलं तर होऊ शकतो काहीही चमत्कार. थोरल्या तालमीतले ‘अमोलबापू’ अन् मुरारजीपेठेतले ‘देवेंद्रदादा’ यांना विश्वासात सोबतीला घेतलं तर बाणाचे टोक अधिकच धारदार..कारण ‘महेशअण्णां’चे सारे वीक पॉईंट या दोघांनाच सर्वाधिक ठावूक. म्हणूनच ‘पुरुषोत्तम’ भाऊंनाही शुभेच्छा...लगाव बत्ती..
गेली पाच वर्षे शहरातल्या सत्तेपासून दुरावलेले ‘हात’ तर आता भलतेच आसुसलेत. ‘प्रणितीताईं’च्या नेतृत्वाखाली ‘कमळ’ खुडायला पुढं सरसावलेत. खरंतर सोलापूरकरांचं ‘शिंदे फॅमिली’वर खूप प्रेम. खूप आपुलकी. भलेही ते त्यांच्या वाढदिवसाला इथं कधी आले नसले तरीही त्यांच्या पश्चात त्यांचा ‘बड्डे केक’ कौतुकानं कापणारी मंडळी दिसतील. आजपावेतो भलेही ते कधी निकालाच्या दिवशी इथं थांबत नसले तरीही त्यांच्या विजयाचा जल्लोष परस्पर मनापासून करणारी माणसं भेटतील. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आनंदात सामील होण्याचे हे दोन भावूक क्षण. त्यांनी सत्तेच्या माहोलमध्ये स्वत:हून कैकदा गमावले. तरीही इथल्या जनतेनं मनातली ही खंत कधी व्यक्त केली नाही.
एकदा ‘मोदी’ लाटेत अन् दुसऱ्यांदा ‘प्रकाश’ वावटळीत ते विजयापासून दूर राहिले; मात्र आजही ‘प्रणितीताईं’च्या शब्दाला प्रतिसाद द्यायला जनता आतुर. अशातच ‘पटोले नानां’नी ‘काहीही करून महापालिका जिंकायचीच’ असे स्पष्ट शब्दात सांगितलेलं. त्यामुळं यंदा केवळ ‘गंध-पावडर-कंगवा’ यावर न भागवता वाट्टेल तेवढ्या पेट्या उघडण्याची तयारी ठेवली गेलेली. पावणेदोन वर्षापूर्वी ‘हात’वाल्या आमदारांचा ‘पाहुणचार’ करण्यासाठी हात आखडता घेतला म्हणून ‘दिल्लीकरां’ची ओढवून घेतलेली नाराजी दूर करण्याची ही नामी संधी. पालिका जिंकून आणली तर वरच्या वर्तुळात दिसणार. मग नक्कीच ‘सोलापूरचं पालकत्व’ हक्कानं मागता येणार.
...पण यासाठी ‘ताईं’ना करावा लागणार सातत्यानं सोलापुरातच मुक्काम. ‘परकीपंडला’च्या पोस्टमुळं सोशल मीडियावर फक्त हवा होणार. प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्यासाठी स्वत: गल्ली-बोळात फिरावंच लागणार हे सांगण्याचं धाडस कदाचित ‘चेतनभाऊं’सारखे सल्लागार करतीलही; मात्र त्यांचंचं भावी ‘शहराध्यक्ष’पद गायब केल्यानं ते स्वत: टेन्शनमध्ये. तरीही ‘ताई अन् भाऊं’ना खूप-खूप शुभेच्छा...लगाव बत्ती...
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर जमिनीवर आलेले ‘कमळ’वाले मात्र आता पुरते कामाला लागलेत. बुथवाईज कार्यकर्ते नेमण्याचं ‘मायक्रो प्लॅनिंग’ अत्यंत शिस्तीत सुरू. दर दहा-पंधरा घरांमागं एक कार्यकर्ता जोडला गेलाय. त्या कार्यकर्त्यानं बाकी काहीच करायचं नाही. फक्त एवढीच घरं सांभाळायची. प्रत्येक मतदाराचा डाटा गोळा करून ही मंडळी आता ‘मिशन फिफ्टी फाईव्ह’वर काम करू लागलीत.
‘हात’वाल्यांचे नेते मुंबईत. ‘घड्याळ’वाल्यांचे नेते संभ्रमात. ‘धनुष्य’वाल्यांचे नेते प्रतीक्षेत. त्यामुळं आपलं काम खूप सोप्पं झालं, अशा भ्रमात राहिलेल्या या ‘कमळ’वाल्यांना अद्याप रस्त्यातल्या स्मार्ट खड्ड्यांची खोली बहुधा दिसली नसावी. संपूर्ण शहर जागोजागी खोदून ठेवल्यानं सोलापूरकरांच्या सहनशीलतेचा बांध फुटलाय. जनता प्रचंड चिडलीय. ही खदखद ‘कमळ’वाल्यांच्या मुळावरच उठणार हे निश्चित. विशेष म्हणजे पालिकेतल्या सत्ताधाऱ्यांना ‘खड्ड्यात घालण्याची सुपारी’ कुणी कुणाला दिलीय हे फक्त ‘अजितदादा’ अन् ‘टेंगळें’नाच माहीत.
असो. इथली सत्ता टिकवायची असेल तर ‘दोन्ही देशमुखां’ना एकत्र यावंच लागणार. यासाठी वेळप्रसंगी म्हणे ‘कोळी’ अन् ‘महागावकर’ यांनाही बाजूला ठेवावं लागणार. नाहीतरी दोन्ही देशमुखांच्या लेकरांनी ही प्रक्रिया अत्यंत शांतपणे सुरू केलीय, हे खूप कमी लोकांना ठावूक. तरीही यांना शुभेच्छा...लगाव बत्ती...