पीएम किसान सन्मान योजनेच्या निकषात बसत नसतानाही काहींनी महसूल प्रशासनाला चुकीची माहिती देऊन प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे आयकर विभागाच्या पडताळणीत आढळून आले होते. सांगोला तालुक्यातील सुमारे १५३० बोगस लाभार्थींनी सुमारे एक कोटी ५४ लाख ७० हजार रुपयांचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
महसूल विभागाकडून अपात्र लाभार्थींना नोटिसा बजावून आठ दिवसात रक्कम जमा करा अन्यथा सक्तीच्या वसुली कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला होता. त्यामुळे शेतकरी सन्मान निधीच्या घेतलेल्या लाभाच्या रकमेचा परतावा करण्यासाठी बोगस लाभार्थींची तलाठी व बॅंकेत धावपळ सुरू आहे. त्यानुसार बोगस लाभार्थींनी आतापर्यंत ६४ लाख रुपयांचा भरणा बँकेत केला आहे. अद्यापही ९० लाख ७० हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. मात्र नोटिसा मिळूनही पैसे जमा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बोगस लाभार्थींना महसूल विभागाकडून दुसरी नोटीस पाठवली आहे. त्यानंतरही सन्मान निधीची रक्कम परत न केल्यास त्यांच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा चढवला जाणार असल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले.