सोलापूर : शहरात सलग दोन दिवस १०० पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तरीही लोक मास्क न वापरणे, गर्दी करणे टाळायला तयार नाहीत. आमचा लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र रुग्णांची संख्या पुढील दोन-तीन दिवस अशीच वाढत राहिली तर कठोर निर्णय अटळ आहे, असा इशारा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला.
शहरात मंगळवारी १०९ तर बुधवारी १३८ कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे स्पष्ट झाले. अनेक नागरिकांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाल्याचेही समोर येत आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात एक दिवसाचा जनता कर्फ्यू लागेल. लॉकडाऊन होईल अशी चर्चा आहे. लोक किराणा दुकाने, भाजी मंडईमध्ये गर्दी करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त पी. शिवशंकर म्हणाले, १५ दिवसांपूर्वी शहरात दररोज २० ते २५ रुग्ण आढळून येत होते. आता एकाच दिवशी १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. ही चिंतेची बाब आहे. या १०० रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतल्यानंतर आणखी जास्त रुग्ण आढळून येतील. लोकांना मास्क वापरा, गर्दी करू नका, सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकला, वर्क फ्रॉम होमवर भर द्या अशा सूचना केल्या आहेत. तरीही गर्दी वाढत आहे. दंडात्मक कारवाई हा उपाय नाही. लोकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक आहे.
पालिकेला कोरोनाचा सामना करण्याचा अनुभव आहे. सध्या आवश्यक त्या आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करून घ्याव्यात अशा सूचनाही वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
सिंहगडसह आणखी तीन क्वारंटाइन सेंटर सुरू होणार
मनपा उपायुक्त धनराज पांडे म्हणाले, क्वारंटाइन सेंटरमध्ये २०० हून अधिक रुग्ण आहेत. सध्या वाडिया, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, पोलीस प्रशिक्षण केंद्र, जुळे सोलापुरातील म्हाडाची इमारत येथील क्वारंटाइन सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. पुढील तीन दिवसांत सिंहगड, ऑर्किड कॉलेज, भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज या ठिकाणी क्वारंटाइन सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
७ हजार रुपयांचा दंड वसूल
पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांनी बुधवारी ३१ जणांवर मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणे, सोशल डिस्टन्स न पाळणे यासह कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन न केल्याबद्दल कारवाई केली आहे. सात हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला. पुढील दोन दिवसात हॉटेल, दुकानदारांवर पुन्हा कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.