सोलापूर : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना सुलभरीत्या लाभ मिळण्यासाठी केंद्र शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र अनेक शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाला ई-केवायसी करणे बाकी आहे, संबंधित विभागांनी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया करून घेण्याविषयी पत्राद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी तथा पी. एम. किसान योजनेच्या जिल्हास्तरीय नोडल अधिकारी शमा पवार यांनी कळविले आहे.
कृषी, सर्व तहसीलदार, ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यातील या योजनेच्या लाभार्थ्यांची बँक खाते पडताळणी केलेल्या आधार क्रमांकाशी जोडून घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पी.एम. किसान योजनेअंतर्गत सप्टेंबर २०२२ पासून वितरित केले जाणारे हप्ते आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या बँक खात्यात जमा होणार असल्याने त्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना अवगत करून माहिती भरून घ्यावी.
-------
पोलीस पाटलांचे सहकार्य घेण्याच्या सूचना
कृषी विभाग व ग्रामविकास यंत्रणा यांच्याशी समन्वय साधून १०० टक्के प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. याकामी गावातील पोलीस पाटील यांचेही सहकार्य घ्यावे, कोणताही पात्र लाभार्थी पी. एम. किसान योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.