सोलापूर : जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी डिसेंबर महिन्यात गाळप केलेल्या उस बिलाची पहिली उचल अद्यापही दिलेली नाही. या कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत अन्यथा सोलापुरातील साखर सहसंचालकांना कार्यालयात कोंडू, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दिला.
रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले, विभागीय सरचिटणीस हणंमत गिरी आणि कार्यकर्त्यांनी प्रादेशिक सहसंचालक पांडुरंग साठे यांना निवेदन दिले. यानंतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दीपक भोसले म्हणाले, शुगरकेन कायद्यानुसार शेतकऱ्यांचा उस गाळप झाल्यानंतर १४ दिवसाच्या आत बिल अदा करणे बंधनकारक आहे. बिल अदा न झाल्यास बॅंकेच्या १५ टक्के व्याजाने रक्कम अदा करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यातील अनेक कारखानदार हा कायदा पायदळी तुडवित आहेत. सहसंचालकांनी कारखान्यांकडून बिल अदा केल्याचा तपशील मागवून घ्यावा. ज्यांनी बिल अदा केले नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. आम्ही अधिकाऱ्यांना १४ दिवसांची मुदत देतोय. कारवाई न झाल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात कोडू, असे भोसले म्हणाले. यावेळी नामदेव पवार, बाळासाहेब बोबडे आदी उपस्थित होते.