पाटील म्हणाले, 'उजनी धरणाच्या पाण्यावर प्रकल्पग्रस्तांचा पहिला अधिकार आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विचारात घेऊन उजनीबाबतच्या या तालुक्याच्या मागण्या आधी पूर्ण कराव्यात. उजनी पाणीवाटप समिती अथवा नियोजनात प्रकल्पग्रस्तांचाही एक प्रतिनिधी असावा, अशी मागणी आपण २०१४ पासून करत करीत आलो आहे.
उजनीची पाणीपातळी कितीही कमी झाली तरी प्रकल्पग्रस्तांसाठी राखून ठेवलेला पाणीसाठा अखंडितपणे त्यांना वापरून द्यावा व दरम्यान काळात वीजकपात न करता मुबलक वीजपुरवठा दिला जावा. उजनीचे ओव्हरफ्लो पाणी कोळगाव धरणात सोडले जावे. करमाळा तालुक्यातील गावांना उजनीतून पिण्याचे पाणी मिळवून देण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनांना मान्यता व निधी उपलब्ध करून द्यावा. उजनीतून मराठवाड्यास पाणी जाणार असून, त्या प्रकल्पाचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातही करमाळा तालुक्यातील काही गावांचा समावेश करून बोगद्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यास मान्यता दिली जावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
याबाबत आपण प्रत्यक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून निवेदन सादर करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.