शीतलकुमार कांबळे/मंगळवेढा : मुंबई येथे आंदोलनासाठी मराठा बांधव जात आहेत. या आंदोलनादरम्यान जर मराठा समाज बांधवांना अटक झाली किंवा अडविण्यात आले तर महिलांनी त्या मतदारसंघातील आमदार व खासदाराच्या घरी ठिय्या आंदोलन करून त्याचा निषेध नोंदवावा, असे मत माऊली पवार यांनी व्यक्त केले.मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २० जानेवारीला अंतरवाली सराटी येथून पायी पदयात्रा मुंबईकडे निघणार आहे. मंगळवेढा तालुक्यातून २५ हजार मराठा बांधव या यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. त्या संदर्भातील बैठक मंगळवेढ्यामध्ये पार पडली.
माऊली पवार म्हणाले, तिकडे मनोज जरांगे-पाटील आंदोलन करीत आहेत म्हणून आपण शांत बसणे योग्य नाही. जास्तीत जास्त संख्येने मराठा बांधवांनी यामध्ये सहभाग नोंदवावा. त्याचबरोबर आपल्या कुणबी नोंदी आहेत काय याची शहानिशा प्रत्येक मराठा बांधवांनी करावी. यावेळी राजन जाधव, गणेश देशमुख, श्रीरंग लाळे, महेश पवार यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चेच्या नियोजनासाठी मंगळवेढा तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकांचे आयोजन केले होते.