सोलापूर : ग्रामपंचायत निवडणुकीची धाकधूक आता संपुष्टात आली आहे. गावपातळीवर राजकारण आता काहीसे शांत झाले आहे. विजयी आणि पराभूत उमेदवारांची राजकीय धावपळ थांबली असली तरी निवडणुकीतील खर्चाचा तपशील प्रशासनाकडे जमा करण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. खर्चाचा तपशील देण्यासाठी निवडणूक कार्यालयाला चकरा मारायची आवश्यकता नाही. त्यामुळे खर्चाचा तपशील ऑनलाईन भरा, असे आवाहन प्रशासनाकडून होत आहे. ऑनलाईन हे ऐच्छिक आहे.
तरीसुद्धा गावपातळीवरील पुढारी ऑनलाईन साक्षर व्हावेत आणि त्यांची धावपळ कमी व्हावी, यादृष्टीने ऑनलाईन तपशिल भरण्याचे अहवान प्रशासनाकडून होत आहे. याकडे उमेदवार दुर्लक्ष करत आहेत. कारण बहुतांश गाव पुढाऱ्यांना मोबाईल नीट हँडल करता येत नाही. अनेक ठिकाणी इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. ऑनलाईन बंधनकारक नसल्यामुळे बहुतांश लोक निवडणूक कार्यालयात येऊन खर्चाचा तपशील जमा करत आहेत. यामुळे निवडणूक कार्यालयावर ताण पडतोय. पुढील काळात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे याची सवय नागरिकांना व्हावी, याकरिता खर्चाचा तपशील ऑनलाईन जमा करण्यासाठी उमेदवारांना प्रोत्साहन करत आहोत. प्रसंगी त्यांना प्रशिक्षण देण्याची देखील तयारी आहे, अशी माहिती दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार यांनी लोकमत''ला दिली.
एकूण झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका - ६५७
विजयी उमेदवार - ६३०१
३० दिवसाच्या आत द्या
ग्रामपंचायत निवडणुकीत ज्यांनी अर्ज दाखल केला आणि नंतर अर्ज मागे घेतला, अशांसाठी देखील उमेदवारी खर्चाचा तपशील देणे बंधनकारक आहे. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, त्यांच्यासाठी सुद्धा खर्चाचा तपशील बंधनकारक आहे.
यासोबत विजयी आणि पराभूत उमेदवारांनाही खर्चाचा तपशील देणे बंधनकारक आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसाच्या आत तपशिल द्यावा लागतो.
एकत्रित गोषवारा ऑफलाईन जमा करा
ऑनलाईन प्रक्रिया सोपी आणि सुटसुटीत आहे. सदर प्रक्रिया उमेदवारांच्या सोयीसाठी आहे. काहीना मोबाईल हँडल करता येत नाही. अशांना आम्ही ऑनलाईन प्रक्रियेची माहिती देऊ. प्रशिक्षण देऊ. खर्चाचा सर्व तपशील दैनंदिननिहाय ऑनलाईन भरा. त्यानंतर एकत्रित खर्चाचा घोषवारा निवडणूक कार्यालयात जमा,करा, अशी माहिती अमोल कुंभार यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वांना ऑनलाईन तपशील भरता आला नाही. काहीना इंटरनेटचा प्रॉब्लेम आला तर काहीना सर्वर डाऊन दिसत होता. त्यामुळे डोकेदुखी वाढली.
- अनसुया राठोड, बोरामणी
ऑनलाईन प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक उमेदवारांना त्रास झाला. उमेदवारी अर्ज दाखलच्या शेवटच्या दिवशी तसेच अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तर बहुतांश उमेदवार ऑनलाईन असल्यामुळे सर्वर डाऊन दिसत होता.
- वैभव हलसगे, बिनविरोध सदस्य