करमाळा : माजी आ. जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व इतरांवर करमाळा पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे खोटे असून, ते माघारी घ्यावेत. अन्यथा येत्या शुक्र वारी तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू, असा इशारा आ. नारायण पाटील यांनी करमाळा तहसील कार्यालयासमोर आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी बोलताना दिला.
करमाळा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुपारी आ. नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. जयवंतराव जगताप, नगराध्यक्ष वैभव जगताप व इतर कार्यकर्त्यांवर बाजार समितीच्या कार्यालयात सभापती निवडणूकप्रसंगी दिग्विजय बागल व शिवाजी बंडगर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल झालेले ३०७ कलम माघारी घेण्यात यावे, या मागणीसाठी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन करण्यात आले.
आ. नारायण पाटील म्हणाले, दिग्विजय बागल यांच्यावर सकाळी ११ वाजता हल्ला झाला, असे फिर्यादित मान्य असेल तर, दिग्विजय बागल उपचाराविना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होते. त्यानंतर मीडियासमोर बोलले. मांगी येथे जाऊन समाधीचे दर्शन घेतले व नंतर विचारविनिमय करून जयवंतराव जगताप यांच्या राजकीय अस्तित्वाला धोका पोहोचविण्याच्या दृष्टीने गुन्हा दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले. गुन्हा दाखल करताना पोलीस ठाण्यासमोर राजकीय भाषणदेखील दिग्विजयने केले. केवळ राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी स्टंटबाजी व नाटक दिग्विजय व रश्मी या बहीण-भावांनी केले आहे. जयवंतराव जगताप यांनी त्यास मारहाण केलेली नाही. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, उपसभापती गहिनीनाथ ननवरे, उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, दत्ता सरडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे, बिभीषण आवटे, अण्णासाहेब बंडगर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब लबडे, दादासाहेब जाधव, सतीश चोपडे, डॉ. अमोल घाडगे, नगरसेवक संजय सावंत, सुनील तळेकर यांच्यासह कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
हातापाया पडून बंडगरांना आपल्यात आणू- शिवाजी बंडगर आपलाच माणूस आहे. नजरचुकीने तो त्या कळपात गेला आहे. सभापतीपद निवडीच्या पूर्वीच्या रात्री ते मला भेटले होते. सभापती जयवंतराव जगताप यांनाच करावयाचे आहे, असे आपण त्यांना सरक सरांच्या समक्ष समजावून सांगितले होते व रात्री पावणेबारा वाजता घरी सोडले. ते बागलांच्या कळपात नजरचुकीने गेले असले तरी त्यांची हातापाया पडून यथोचित पूजा करून आपल्यात आणू, असे आ. नारायण पाटील यांनी आपल्या भाषणातून सूचक वक्तव्य केले.