आपल्या सभोवतालच्या असलेल्या सजीव-निर्जीव आणि वातावरणासनिसर्ग म्हणतात. मी मागील २२ वर्षांपासून वाइल्ड लाइफ फोटोग्राफी आणि प्रवासाच्या माध्यमातून निसर्गाच्या सान्निध्यात जातो आहे. आता माझं आणि निसर्गाचं एक सुंदर आणि घट्ट नातं निर्माण झालं आहे. निसर्गात वावरताना अनेक गोष्टी जवळून पाहायला आणि अनुभवायला मिळाल्या. हे करीत असताना निसर्गासमोर माणूस किती छोटा आहे याची वेळोवेळी प्रचिती येते. निसर्गाने मला चांगले आयुष्य जगण्यासाठी अनेक धडे दिले आहेत यामुळे आता निसर्ग हा माझा गुरु बनला आहे.
अनेक वेळा निसर्गाची निर्मिती कशी झाली असेल, याबद्दल मला प्रचंड कुतूहल आहे़ लहानपणी आम्हाला सांगितले जायचे की देवाने प्रथम निसर्गाची निर्मिती केली आणि नंतर सजीव निर्माण झाले. देव ॠडऊ म्हणजे ॠ :ॠील्ली१ं३ी ड : डु२ी१५ी२ ऊ :ऊी२३१ङ्म८२ निसर्गाचा मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट येते़ येथे प्रत्येक घटकाला स्वत:चे महत्त्व आहे. यातील एक जरी घटक कमी अथवा नाहीसा झाल्यास निसर्गात असमतोल होतो आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांना भोगावे लागतात.
निसर्गाने मला अनेक धडे दिले आहेत़ त्यापैकी दोन किस्से आपणासमोर मांडतोय. पहिला किस्सा : जेव्हा मी कोणताही पक्षी किंवा प्राणी यांची दिनचर्या जवळून पाहतो, तेव्हा मला पक्षी / प्राणी दररोज त्यांना जेवढी भूक आणि गरज आहे तेवढेच ताजे अन्न खातात. मी पक्ष्यांना / प्राण्यांना कधी महिनाभराचे अन्न साठविलेले पाहिले नाही. ते अन्न जास्त आहे म्हणून नासाडी करीत नाहीत. यातून मी एका गोष्टीचा बोध घेतला की, आपणास सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी फार कमी अन्न लागते. एक माहिती म्हणून सांगतो की, देवाने आपल्या जठराचा आकार आपल्या मुठीएवढाच दिलेला आहे़ याचा अर्थ आपल्यालासुद्धा जगण्यासाठी दररोज कमी अन्न लागते. साहजिकच आपल्याला अन्न खरेदीसाठी धन लागते. पण हल्ली मनुष्य पुढच्या पिढीसाठी धनसंचय करण्याच्या आणि भौतिक सुखाच्या नादात स्वत: आयुष्यात सुख आणि आनंद लुटणं विसरून गेलाय.
दुसरा किस्सा : काही वर्षांपूर्वी ताडोबा जंगलात फिरताना मला काही अंतरावर एक वाघीण दिसली. त्या वाघिणीचे निरीक्षण करीत असताना काही अंतरावर जाऊन ती झुडपात लपून बसली. याचे कारण शोधताना लक्षात आले की, वाघिणीपासून शंभरेक मीटर अंतरावर ४० ते ५० हरणांचे कळप चरत होते. सर्व हरीण खाण्यात दंग होते. वाघीण दडून बसलेल्या शेजारच्याच झाडावर तीन लंगूर बसले होते. जशी वाघिणीने त्या झुडपातून वेगाने हरणांकडे झेप घेतली तेव्हा झाडावर बसलेल्या लंगुराने जोरात आवाज करीत जंगलात सावधतेचा इशारा दिला. त्याच क्षणी हरणाच्या कळपाने सावध होऊन जंगलात पळ काढला आणि दिसेनासे झाले. लंगुरांच्या इशाºयामुळे त्यांना जीवनदान मिळाले. यातून मी एका गोष्टीचा बोध घेतला की, आपल्या जीवनात प्रत्येक माणसाने जर एकत्रित आणि संघटित राहून एकमेकांना वेळीच मदत / सहाय्य केले तर आपण प्रत्येकाच्या आयुष्यातील संकटावर मात करू शकतो.
प्रत्येक वाचकाने वरील मिळालेल्या बोधापासून शिकून ते स्वत:च्या जीवनात अमलात आणल्यास आपले आयुष्य सुखी आणि आनंदी होईल यात शंकाच नाही. निसर्गाने मला दिलेले काही धडे मी पुढील लेखाद्वारे आपणापर्यंत पोहोचवेन. - डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ अन् छायाचित्रकार आहेत)