सोलापूर : दिव्यांग व्यक्तीने सुद्धा सामान्य व्यक्तीप्रमाणे जीवन जगावे यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून दिव्यांगाशी सामान्य (अव्यंग) व्यक्तीने विवाह केल्यास ५० हजारांचे अनुदान दिले जाते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनानुसार आंतरजातीय विवाहाच्या धरतीवर दिव्यांग- अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहा पात्र लाभार्थ्यांना सुनील खमितकर जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
सुनील खमितकर यांनी दिव्यांगांना विविध योजनेचा लाभ देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल, असे सांगितले. दिव्यांग जोडप्यांना पुढील वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी दिव्यांग विभागाचे सच्चिदानंद बांगर, शशिकांत ढेकळे उपस्थित होते. कार्यक्रमासाठी कमलाकर तिकटे, सुरेश भोसले यांनी सहकार्य केले.
जोडप्यांनी मानले आभारदिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागामार्फत दहा दिव्यांग जोडप्यांना प्रत्येक ५० हजार रुपयांचा धनादेश वाटप करण्यात आला. त्यामुळे दिव्यांग जोडप्यांना समाजकल्याण विभागाचा आधार मिळाला असल्याचे मत दिव्यांग जोडप्यांनी व्यक्त केले.