सोलापूर - तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी आज पंढरपुरात विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर सरकोली येथील शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी आले. इथे त्यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला. केसीआर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकदा आम्हाला संधी देऊन पहा, इथे शेतकऱ्यांना विमा का नाही, असा सवाल करत भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना पक्षांवर तोफ डागली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावरही टीका केली. डिजिटल इंडिया म्हणतात, पण शेतकऱ्यांसाठी का नाही डिजिटल इंडिया, असा सवाल केसीआर यांनी केला. तसेच, मेक इन इंडियावरुनही टीका केली.
मी मराठीत बोलू शकत नाही, परंतू मराठी समजू शकतो. स्वातंत्र्याची लढाई आज पुन्हा एकदा लढावी लागणार आहे. नव्या उदयाच्या दिशेने देशाला चालावे लागणार आहे. जगातील अनेक देश आपल्यासमोरच कुठल्याकुठे पोहोचले आहेत. सा. कोरिया, जपान, सिंगापूर, मलेशिया, बाजुला चीन आहे. १९८२ पर्यंत चीन आपल्यापेक्षा गरीब होता. आज कुठे आहे, याचा विचार करावा लागेल. निवडणुका येतात, जातात कोणी ना कोणी जिंकत असतो. आजवर किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रात एक पक्ष सांगा ज्याला तुम्ही संधी दिली नाही. काँग्रेसला ५० वर्षे, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाला संधी दिलीत. करायचे असते तर यापैकी कोणीतरी केले असते. तेलंगानाच्या छोट्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्वकाही केले जाऊ शकते. भालकेंनी तुम्हाला सर्व योजना सांगितल्या आहेत. जर तेलंगानात या गोष्टी होत असतील तर महाराष्ट्रात का नाही. शेतकऱ्यांना विमा का नाही, असा सवाल केसीआर यांनी विचारला.
भारत राष्ट्र समिती ही कुठल्याही पक्षाची ए किंवा बी टी नसून ही टीम शेतकऱ्यांची आहे, दलितांची आहे, मागासवर्गीयांची आहे, असे म्हणत काँग्रेस आणि भाजपला प्रत्युत्तर दिलं. तसेच, मोदी सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला, पण शेतकऱ्यांसाठी आहे का डिजिटल इंडिया, शेतकऱ्यांना आजही तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. मात्र, आम्ही तेलंगणातील शेतकरी डिजिटल केला आहे. सर्वकाही एका क्लिकवर आणि बायमेट्रीक आहे, असे केसीआर यांनी म्हटलं. त्यासोबतच, मोदीजींनी मेक इन इंडियाचा नारा दिला होता. पण, मेड इन इंडिया कुठं दिसतंय, सगळीकडे मेड इन चायनाच आहे. दिवाळी असो की होळी, संक्रांतीचा पतंग असो कि रांगोळी... सगळ्यांसाठीच चालना माल येतो, मेक इन इंडिया म्हणता मग गावागावात चायना बाजार का भरतो, असे म्हणत मोदी सरकारच्या धोरणावरही चंद्रशेखर राव यांनी जबरी टीका केली.