पंढरपूर : शरद पवार यांचा प्रचार करायचा असेल तर भाजपामुळे मिळालेली पदं सोडावीत, अशा शब्दात मंत्री सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांचे नाव न घेता टीका केली.
सोलापूर, माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आज श्रीराम मंगल कार्यालयात पार पडली़ यावेळी सोलापूर लोकसभेचे प्रभारी खा़ अमर साबळे, माढा लोकसभेचे प्रभारी अविनाश कोळी, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़
सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघाच्या महत्त्वाच्या बैठकीला पालकमंत्री गटाने दांडी मारल्याने पुन्हा एकदा भाजपमधील गटबाजी समोर आली. माढ्यामधून शरद पवार आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा असल्याने भाजपासाठी हे मोठे आव्हान असताना अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले.
पालकमंत्र्यांच्या गटाने या बैठकीकडे पाठ फिरविल्याने वैतागलेल्या सहकारमंत्र्यांनी थेट पालकमंत्री गटातील पदाधिकाºयांना इशारा दिला आहे. भाजपमध्ये आलेल्या पवारप्रेमींना जर त्यांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेल्या पदांचे राजीनामे द्यावे लागतील असे त्यांनी सुनावले़ खासदार संसदेच्या अधिवेशनात असल्याचे तोकडे समर्थन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी करून वेळ मारून नेली.
माढ्यामधून शरद पवार निवडणूक लढविणार हे खरे असले तरी या वयात त्यांना कार्यकर्त्यांनी त्रास द्यायला नको होता, असे सांगत राज्यातील जनतेच्या आग्रहामुळे पवार माढ्यातून उभारतील असा दावाही सुभाष देशमुख यांनी केला. पवार आणि शिंदे यांच्याविरोधात भाजपच निवडणूक लढवणार आहे, असे सांगत उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.