सोलापूर शहरालगत असलेल्या छोट्या वसाहती आणि विडी घरकुल यामुळे कुंभारी गावाची लोकसंख्या वाढत आहे. येथील पिण्याचे पाणी, रस्ते, सांडपाणी या प्रश्नांमुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत. स्थानिक नेत्यांची मूलभूत प्रश्नाकडे डोळेझाक होत असल्याची तक्रार तरुण वर्ग सोशल मीडियातून सातत्याने करीत असतो, परंतु मीडियाशी फारसा संबंध नसल्याने त्यांच्यापर्यंत चर्चा पोहोचत नाही अशीही तरुणांची खंत आहे. निवडणुकीत विकासाच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी दोन्ही पॅनेल दहशतीचे आरोप करण्यात मग्न आहेत.
भाजप प्रणीत गेनसिद्ध कुंभेश्वर ग्रामविकास आघाडी ही झेडपी पक्षनेते आण्णाराव बाराचारे, शिरीष पाटील, रामचंद्र होनराव, प्रभूलिंग कटारे यांच्या नेतृत्वाखाली उतरली असून, काँग्रेसचे आप्पासाहेब बिराजदार, बिपिन करजोळे, धीरज छपेकर, शिवानंद आंदोडगी यांच्या शंभू गेनसिद्ध ग्रामविकास पॅनेलशी थेट सामना आहे. ग्रामपंचायतीवर बिराजदार गटाचे वर्चस्व होते. नंतरच्या काळात पाटील गटाने फोडाफोडी करून हा गट दुर्बल केला. त्यातून सतत अविश्वास ठराव, न्यायालयीन लढाई, स्थगिती यामुळे पाच वर्षे गावात अस्थिरता होती.
अस्थिरता नको, गटातटाचा वाद टाळण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासमोर दोन्ही गटाच्या तीन बैठका झाल्या. अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यात मागील निवडणुकीत हिशेब सादर न केल्याने दिग्गज उमेदवार रिंगणाबाहेर राहिले, तरीही निवडणुकीची चुरस कमी नाही. दोन्ही गट साम-दाम-दंड-भेद करण्याच्या तयारीने निवडणुकीत उतरले आहेत.
----------
चौकट
सरपंच एका गटाचा, सह्यांचे अधिकार दुसऱ्या गटाकडे
तीन वेळा सरपंच सिद्धाराम इमडे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला, परंतु तांत्रिक कारणामुळे आणि न्यायालयीन लढाईतून त्यांचे पद कायम राहिले. राज्यात भाजपची सत्ता असल्याने तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे कवच इमडे यांना लाभले. मात्र, बहुमत असल्याने आप्पासाहेब बिराजदार यांनी सह्यांचे अधिकार आपल्याकडे खेचून घेतले.
------
ग्रामपंचायत कुंभारी
सदस्य संख्या १७
उमेदवार ३८
मतदार संख्या १२,४००
मुख्य लढत - शिरीष पाटील गट विरुद्ध आप्पासाहेब बिराजदार गट