सोलापूर : महापालिकेच्या अर्धा एकर जागेवर एका कुस्ती केंद्राचे बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण हटाव पथकाने तगड्या पोलिस बंदोबस्तात गुरुवारी दुपारी जमीनदोस्त केले. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामानंतर महापालिकेने केलेली ही दुसरी मोठी कारवाई आहे.
महापालिकेला एका उद्योजकांकडून ही जागा मिळाली होती. एका राजकीय नेत्यांनी या जागेवर कुस्ती केंद्र बांधले होते. महापालिकेतील नगरसेवकांनी ही जागा कुस्ती केंद्राला देण्याचा ठराव ही मंजूर केला होता. हा ठराव बेकायदेशीर असल्याचे सांगत प्रशासनाने हा प्रस्ताव विखंडनासाठी पाठवला होता. या दरम्यान राजकीय नेत्याने महापालिकेविरुद्ध उच्च न्यायालय धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती.
यानंतर महापालिकेने गुरुवारी दुपारी बांधकाम पाडायला सुरुवात केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्यासह महापालिका आणि पोलीस खात्याचा मोठा फौजफाटा होता. पाडकाम सुरू असताना राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना समज देऊन बाजूला केले. दुपारी अडीच वाजेपर्यंत पाडकामाची कारवाई पूर्ण झाली होती.