शेगाव दुमाला (ता. पंढरपूर) येथे पहाटे ५ वाजेच्या सुमारास अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांना मिळाली. त्यांनी तत्काळ पोलिसांचे पथक खासगी वाहनाने तीन रस्ता परिसरात पाठवले. यावेळी शेगाव दुमाला गावाकडून तीन ट्रँक्टर वाळू वाहतूक करताना दिसले. त्या ट्रॅक्टरला तीन रस्ता भोसले पेट्रोलपंपाजवळ पोलिसांनी थांबवले. यानंतर सुहास ज्ञानेश्वर साळुंखे (वय ३७), गणेश शिवाजी आटकळे (२५) आणि नीलेश बंडू आटकळे (२२, रा. शेगाव दुमाला, ता.पंढरपूर) या तीन ट्रॅक्टरचालकांना ताब्यात घेतले.
या कारवाईत पाच लाख तीन हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर, एक डम्पिंग ट्राॅली व त्यामध्ये तीन हजार रुपये किमतीची अर्धाब्रास वाळू, दुसरा दोन लाख तीन हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व डम्पिंग ट्राॅली व त्यामध्ये देखील तीन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू आणि तिसरा चार लाख ९३ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर व डम्पिंग ट्राॅली व त्यामध्येदेखील तीन हजार रुपये किमतीची अर्धा ब्रास वाळू अशी दीड ब्रास वाळू आणि तीन डम्पिंग ट्राॅलीसह सुमारे बारा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याबरोबरच संशयित तीन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध आणि अज्ञात ट्रॅक्टरमालकांविरुद्ध भादंवि कलम ३७९, ३४ सह गौण खनिज कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.