मंद्रुप : भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन सुरूच असून, शनिवारी या वाळूची चोरटी वाहतूक करणारी वाहने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याच पुढ्यात आली आणि सगळ्यांचीच धांदल उडाली. वाहन नेमके कुठे वळवायचे हा प्रश्न वाहन चालकासमोर निर्माण झाला. तेवढ्यात तहसीलदार मॅडमची गाडी आडवी आली आणि त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले, हा प्रकार माळकवठा गावानजीक घडला.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मतदारसंघात माळकवठे गावात नियोजित दौरा होता. मंद्रुप येथील कार्यक्रम आटोपून मंत्री महोदय जेव्हा माळकवठे गावाजवळ आले, तेव्हा वाळूची अवैध वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर रांगेने सामोरे आले. समोर पोलिसांची गाडी, त्या पाठीमागे मंत्र्यांची गाडी पाहून वाहन चालक चांगलेच गोंधळून गेले.
वाहन पुढे हाकावे की बाजूला वळवावे हे त्यांना सुचेना. त्यातील एकाने ट्रॅक्टर वळवण्याचा प्रयत्न करीत असताना तहसीलदार रमा जोशी त्यांच्या वाहनासमोर येऊन उभ्या राहिल्या. पाठीमागे मंत्री महोदय आणि त्यांच्यासमवेतचा पोलीस ताफा तर समोर तहसीलदारांची गाडी अशा कोंडीत सापडल्याने वाळू वाहतूक करणाºयांची चांगलीच कोंडी झाली़ त्यातील एका ट्रॅक्टरचालकाने दुसºयाला डाफरले, म्हणाला, ‘तुला माहीत नव्हतं तर मला या रस्त्याने का बोलावलं ? आता बस बोंबलत’...
तहसीलदार रमा जोशी यांनी तिन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेतले आणि वाळूसह तीनही वाहने मंद्रुप पोलीस ठाण्यात आणून जमा करण्यात आली़ प्रत्येक ट्रॅक्टरसाठी एक लाख २६ हजार प्रमाणे चार लाखांचा दंड आकारण्यात आला़ या कारवाईत मंद्रुपचे तलाठी निंगप्पा कोळी, निंबर्गीचे मंडल अधिकारी जानराव, माळकवठेचे तलाठी मगर यांनी भाग घेतला.
एरव्ही अधिकारी असतात कुठे- वाळू उपसा करून त्यांची चोरटी वाहतूक करणारी वाहने रोजच आमच्या गावातून जातात़ दिवसभरात अशी शेकडो वाहने आम्ही पाहतो़ आज मंत्री महोदय आल्याने त्यांच्यासोबत तहसीलदार आल्या़ मंडल अधिकारी आले म्हणून कारवाई झाली, एरव्ही हे सगळे अधिकारी जातात कुठे ? असा सवाल माळकवठे येथील ग्रामस्थांनी केला