सोलापूर : पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरीस) गणेशमूर्ती घरीच विसर्जित करता येणे शक्य आहे. पाण्यात खाण्याचा सोडा (सोडियम बायकार्बोनेट) किंवा अमोनियम बायकार्बोनेट घातल्यास मूर्ती विरघळते. त्यामुळे भाविकांनी घरीच खाण्याचा सोडा वापरून गणेशमूर्ती विसर्जित करावी, असे आवाहन सोलापूर मूर्तिकार असोसिएशने केले आहे. असोसिएशनतर्फे नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
बादलीत पाणी घेऊन त्यात खाण्याचा सोडा घालून पूर्ण विरघळावा. निर्माल्य व सजावटीच्या वस्तू बाजूला काढून फक्त मूर्ती या पाण्यात विसर्जित करावी. दर दोन ते तीन तासांनी मिश्रण काटीने ढवळावे. ४८ तासात मूर्ती विरघळते. प्लॅस्टिक पेंटचा थर मूर्तीच्या बाजूला करावा. यामुळे मूर्ती लवकर विरघळण्यास मदत होते. बादलीच्या तळाशी कॅल्शियम कार्बोनेटचा थर जमा होतो. हे तयार झालेले द्रावण दोन दिवस बाजूला ठेवल्यास कॅल्शियम कार्बोनेटचा थर पाण्यापासून वेगळा होतो. मूर्तीचा काही भाग न विरघळल्यास पुन्हा नवीन बादली घेऊन त्यात द्रावण तयार करावे. त्यात न विरघळलेला भाग पुन्हा घालून ढवळल्यास उरलेला भागही विरघळतो.
---------
खत म्हणून वापर
मूर्ती विरघळून तयार झालेले पाणी अमोनियम सल्फेट असते. यात समप्रमाणात पाणी मिसळून ते झाडांना खत म्हणून वापरता येते. एका कुंडीमध्ये ५०० मिली लिटर तर मोठ्या झाडांना प्रत्येकी दोन लिटर पाणी देता येते.
-------
असे असावे द्रावणाचे प्रमाण
मूर्तीची उंची बादलीचे आकारमान पाण्याचे प्रमाण खाण्याचा सोडा
- ६ उंचपर्यंत १० लिटर ८ लिटर १ किलो
- ७ ते १० इंच १५ लिटर १० ते १२ लिटर २ किलो
- ११ ते १४ इंच २५ लिटर २० ते २२ लिटर ४ किलो
- १५ ते १८ इंच ५० लिटर ४० ते ५० लिटर ६ किलो
खाण्याचा सोडा आणि अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून शास्त्राप्रमाणे घरच्या घरीच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करता येते. ही पद्धत अगदी सहज व सोपी आहे. स्वत:च्या हाताने विसर्जन करत असल्यामुळे आपली भावना व परंपरा दोन्हीही जपली जाते.
- उमेश सूर्यवंशी, सदस्य, महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान