सोलापूर : प्रशासनाने वारंवार सूचना करूनही धर्मवीर संभाजी तलाव येथे श्री गणेशमूर्तींचे विसर्जन सुरूच आहे. पोलिसांचा बंदोबस्त असला तरीही मूर्तींचे विसर्जन केल्याचे आढळून आले. प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या सूचनेकडे दुर्लक्ष करून तलावात विसर्जन करण्यात येत आहे. संध्याकाळी गर्दी होऊ शकते. याचा विचार करून अनेक लोक दुपारी विसर्जन करत असल्याचे दिसून आले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाने धर्मवीर संभाजी तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जनास मनाई केली आहे. विसर्जन करू नये, या आशयाचा फलक लावूनही अनेक लोक तलावातच विसर्जन करत असल्याचे दिसून आले. विसर्जन करण्यापूर्वी काही लोकांनी तलाव परिसरात पाहणी करतात. तेथील लोकांशी बोलून माहिती घेतात. कारवाई होणार नाही,हे समजल्यावर दुपारची वेळ निवडून विसर्जनाला येत आहेत. यापैकी अनेक जण गणेशमूर्ती कुणाला दिसू नये, याची काळजीही घेतात.
पुलावरून आल्यानंतर डाव्या बाजूला तलावाकडे जाण्याचा रस्ता आहे. तिथे लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सवर विसर्जन करण्यास मनाईचा फलक लावला आहे. या फलकाच्या डावीकडून तलाव परिसरात जाण्याचा अणखी एक रस्ता आहे. या रस्त्याचा वापर करून काही लोक गणेशमूर्तीचे विसर्जन करत आहेत. बाजूलाच एका कोपºयात निर्माल्य टाकण्यात येते. पूजा करून लगेच मूर्तीचे विसर्जन करण्यात येते.-------------------सैनिकनगरची बाजू मोकळीचसैनिकनगरच्या मागच्या बाजूला तलावाचा एक भाग आहे. तिथे कोणत्याही प्रकारच्या सूचना लावण्यात आलेल्या नाहीत. तसेच या परिसरात पोलीसही येत नाहीत. या रस्त्यावरून काही मोजकीच वाहने जात असतात. याचा विचार करून काही लोक सैनिकनगरच्या मागील बाजूस असलेल्या तलावात मूर्तीचे विसर्जन करत असल्याचे आढळले. दुचाकीवरून येऊन अवघ्या काही वेळात विसर्जन करण्यात येत आहे.