राकेश कदम. सोलापूर : महापालिका आयुक्त शितल तेली उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या उपस्थितीत तुळजापूर रोडवरील दगड खाणीत शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे गुरुवारी दुपारी विधीवत विसर्जन करण्यात आले. शहरातील बहुतांश प्रमुख गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींचे या खाणींमध्येच विसर्जन करण्यात येत आहे.
महापालिकेने शहरातील तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यास बंदी घातली आहे. घरगुती गणपती विसर्जनासाठी कुंडांची सोय केली आहे. तीन फुटापेक्षा मोठ्या मूर्ती दगड खाणींमध्ये विसर्जित करावे असे आवाहन केले होते. त्यानुसार तुळजापूर रोडवरील दगड खाणींमध्ये गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे म्हणाले की, महानगरपालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विभागीय कार्यालय 1ते 8 यामध्ये एकूण 83 मूर्ती संकलन केंद्र करण्यात आले आहेत.त्याद्वारे सोलापूर शहरातील गणेश मूर्ती संकलन करण्यात येत आहेत.
संकलन करण्यात आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन सिद्धेश्वर तलाव येथील, गणपती घाट, विष्णू घाट, तुळजापूर रोडवरील खाणीत, रामलिंग नगर येथील विहीर , लक्ष्मी-विष्णू चाळीतील जुनी विहीर,अशोक चौक येथील मार्कंडे गार्डन येथील विहीर,आदी ठिकाणी सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज तुळजापूर रोड येथील खाणीमध्ये श्री गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जन करण्यात आले.