सोलापूर - केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याला विरोध करत आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला सोलापूर शहरासोबत संपूर्ण जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान, सोलापूर शहरातील बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते, बाजार समितीत दुपारपर्यंत शुकशुकाट दिसत होता. याशिवाय शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नवीपेठ, कुंभार वेस, विजापूर वेस, लक्ष्मी मार्केट, जोडबसवण्णा चौक, अशोक चौक, दत्त नगर, जिल्हा परिषद परिसर, पार्क चौक आदी ठिकाणी बंदचा परिणाम दिसून आला. परिवहन महामंडळाने काही मार्गावरच्या एसटी गाड्या बंद ठेवल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
महाविकास आघाडीचा मोदी सरकारवर हल्लाबोल
भारत बंदला सोलापुरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सकाळी अकराच्या सुमारास महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांनी शहरात दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर शहरातील विविध भागात घोषणाबाजी करीत केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्याला विरोध दर्शविला. यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल करीत निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. याचवेळी शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष प्रकाश वाले,राष्ट्रवादी काँग्रेस कार्यध्यक्ष संतोष पवार,शिवसेना शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, लहू गायकवाड,संताजी भोळे, सचिन साळुंखे, बाळासाहेब गायकवाड, शंकर चौगुले, तुषार आवताडे, बाबा नीळ, रोहित अक्कलकोटे, पृथ्वीराज खैरमोडे व शिवसेनेचे सर्व पादाधिकारी उपस्थित होते.
- बहुजन वंचित आघाडीने भारत बंदमध्ये सहभागी होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निर्दशने केली.
- माकपाच्यावतीने दत्त नगरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विरोटमोर्चा काढण्यात आला.
बंदचा सोलापूर जिल्ह्यातही परिणाम...
- करमाळा : नव्या कृषी कायद्या विरोधात भारत बंद ला करमाळयात शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला असुन बाजार समिती,भाजी मार्केट व धान्य बाजार सह व्यापारी पेठ बंद मध्ये सहभागी झाला आहे.
- कुर्डूवाडी शहरासह परिसरात नव्या कृषी कायद्या विरोधात भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद, येथील बाजार समिती,भाजी मार्केट व धान्य बाजार, किराणा दुकानं व व्यापारी पेठांचा यामध्ये सहभाग
- बार्शी शहरात ही बाजार समिती, भाजी मंडई,,, सह अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद... बंदला शंभर टक्के प्रतिसाद
- भारत बंदला महूद गावासह ग्रामीण भागातील पंधरा गावात शंभर टक्के प्रतिसाद शेतकऱ्याच्या भारत बनला पाठिंबा दर्शवल्याने सर्वत्र शुकशुकाट आहे