सोलापूर : विकासाच्या मुद्यावर शेजारच्या पाथरी व हिरज गावकऱ्यांनी दाखविलेल्या एकीप्रमाणे स्वत:च्या गावात बिनविरोधसाठी प्रयत्न झाले नसल्याचे शल्य तिऱ्हे ग्रामस्थांना बोचत आहे. त्यामुळेच प्रचारात म्हणावी तेवढी चुरस दिसत नाही.
उत्तर सोलापूर तालुक्यात कधी नव्हे ते यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधसाठी अनेक गावांत चर्चा व प्रयत्न झाले. त्यात अतिशय राजकीय संवेदनशील पाथरी गावची निवडणूक बिनविरोध झाली. याप्रमाणे दोन जागांचा अपवाद सोडला तर ९ सदस्य बिनविरोध झाले. शेजारच्या पाथरी, हिरजप्रमाणे आपल्याही गावची निवडणूक बिनविरोध झाली असती तर बरे झाले असते, असे आता तिऱ्हेचे नागरिक बोलत आहेत. त्याचा परिणाम म्हणून प्रचारात काही मोजकेच तरुण सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी निवडणुकीकडे कानाडोळा करीत आपापल्या शेती उद्योगाला प्राधान्य दिले आहे.
असेच चित्र बीबीदारफळ येथील आहे. गेली १० वर्षे सत्तेवर असलेल्या जनकल्याण महाविकास आघाडीचे शिवाजी पाटील यांनी बिनविरोध निवडणूक करण्यास होकार दिला होता. मात्र विरोधी गटाने अमान्य केल्याने निवडणूक लागली आहे. गावातील वृद्ध व तरुण वर्ग बिनविरोध झाली असती तर बरे झाले असते असे प्रचारादरम्यान बोलत आहेत. प्रत्येक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या बदलणाऱ्या भूमिकेचा परिणाम गावपातळीवर झाल्याचे दिसत आहे.