कुर्डूवाडी : माढा व करमाळा तालुक्यातील बँक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करावी. पात्र लाभार्थ्यांना तत्काळ कर्ज उपलब्ध करून द्या. त्याचबरोबर महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी त्वरित सोडवाव्यात अशा सूचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्या.
माढा व करमाळा तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची शुक्रवारी सकाळी १२ ते ४ दरम्यान कोरोना उपचार, बँक प्रकरणे व इतर विविध शासकीय कामाबाबत खासदार नाईक निंबाळकर यांनी कुर्डूवाडी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, झेडपीचे माजी सभापती शिवाजी कांबळे, जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, सविताराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, राज्य कार्यकारिणी सदस्य गोविंद कुलकर्णी, रयत संघटनेचे सुहास पाटील, माढा भाजपचे तालुका अध्यक्ष योगेश बोबडे, युवा मोर्चाचे उमेश पाटील, करमाळा भाजप तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, माढा तहसीलदार राजेश चव्हाण, करमाळा तहसीलदार समीर माने, माढा बीडीओ संताजी पाटील, करमाळा बीडीओ राजाराम भोंग उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार रणजित नाईक-निंबाळकर म्हणाले, जे बँक अधिकारी कर्ज देताना शेतकऱ्यांना खोटी माहिती देत असतील तर त्यांना वरिष्ठांकडून निलंबित केले जाईल. कोणत्याही बँकेला ठराविक योजना सोडल्या तर कार्यक्षेत्र नसते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला योग्य सेवा द्यावी. याबरोबरच बँकेची कर्जेप्रकरण देताना सीसीटीव्हीमध्ये त्याचे संकलन करावे, महसूल विभागातील तक्रारीबाबत संबंधीत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने कारवाई करून न्याय द्यावा अशा सूचना यावेळी दिल्या.
----
व्यायाम शाळेचे पैसे उचलणाऱ्यावर फौजदारी करा
यावेळी खासदार नाईक निंबाळकर व्यायामशाळेतील बोगस निधीप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर संतापल्याचे निदर्शनास आले. टाकळी (टें.) येथील व्यायामशाळा न बांधता संबंधित अधिकाऱ्यांनी तब्बल सात लाख रुपये उचलले आहेत. ही तक्रार गंभीर असून, संबंधितावर त्वरित फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याच्या सूचना माढा बीडीओंना केल्या. याचबरोबर दोन्ही तालुक्यातील पानंद रस्ते, शिव रस्ते, रेल्वेविषयी प्रश्न, विविध शासकीय योजनांविषयी आढावा घेण्यात आला.
.........................
फोटो :
टाकळी (टें.) येथील बोगस व्यायामशाळेबाबत अधिकाऱ्यांना सुनावताना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर.
160721\img_20210716_144714.jpg
खासदार नाईक निंबाळकर बैठक फोटो