मैत्रीचं हे अनोखं नातं असतं... त्याची प्रचिती आपणास वेळोवेळी येते. काहीवेळा हे नातं रक्ताच्या नात्याइतकंच किंबहुना थोडं जास्तच दृढ असतं़ याचा अनुभव मला अनेक वेळा आला़ रक्ताची नाती ही आपणांस निवडता येत नाहीत, पण चांगले मित्र आपण निवडू शकतो. माझ्या शैक्षणिक वाटचालीत तसेच सामाजिक संस्थेमध्ये काम करताना चांगले मित्र मिळाले. असं म्हणतात, ‘संकटसमयी मदत करणाराच खरा मित्र’. मैत्रीच्या गोष्टीचा अनुभव मला अनेकवेळा आला़ पण पैकी दोनच अनुभव इथं मांडत आहे.
पहिला अनुभव : काही वर्षांपूर्वी उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली़ यात मनुष्यहानी, निसर्गाचे नुकसान झाले़ ही बातमी टीव्हीवर पाहत असतानाच माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला, तू नेहमी सांगत असतो की, मैत्रीचं जाळं दूरवर पसरलंय़ मला एका गोष्टीसाठी मदत करशील का? मी तिला विचारलं, काय मदत हवी आहे. तिने सांगितले की, तिच्या कंपनीत काम करणाºया एका अधिकाºयाचे आई-वडील उत्तराखंडातील या नैसर्गिक आपत्तीवेळी केदारनाथ या मंदिरात आहेत आणि त्यांचा ठावठिकाणा लागत नाही़ संपर्कही होत नाही. मनात विचार आला की, माझ्या संपर्कावर मित्रांचा किती विश्वास आहे़ मी प्रत्युत्तर दिलं, प्रयत्न करतो अन् विनंती केली त्या दोन्ही व्यक्तींची नावे, त्यांचा मोबाईल नंबर मेसेज कर. मी उत्तराखंडातील रोटरी गव्हर्नर मित्र कर्नल दिलीप पटनाईक याला फोन केला. त्याला मी सर्व परिस्थिती सांगितली़ त्याने मला सांगितले की, उत्तराखंडातील या नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांना योग्य स्थळी पाठवण्यासाठी विमानतळाचा प्रमुख अधिकारी म्हणून काम पाहत आहे. तो मेसेज वाचून मला त्या अधिकाºयाच्या आई-वडिलांचा ठावठिकाणा लागल्यास मला कळवेल. अगदी काही तासातच त्याचा फोन आला़ त्यांनी सांगितलं तू चौकशी करीत असलेल्या अधिकाºयाचे आई-वडील सुखरूप आहेत आणि त्यांना नजीकच्या विमानतळावर पाठवून दिले आहे. मला हे ऐकून आनंद तर झालाच, पण एक मित्र माझ्या मित्रांसाठी नैसर्गिक आपत्तीत अशक्य अशा मदतीला धावून येतोय, याचा अभिमान वाटला. लगेच मी मैत्रिणीला फोन करून ही गोड बातमी सांगितली.
दुसरा अनुभव : मी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी करताना एक मित्र भेटायला आला. त्याच्या चेहºयावर प्रचंड ताण होता. मी त्याला काय झाले, असे विचारल्यानंतर आज मला तातडीची एक मदत हवी आहे, असे तो म्हणाला. बहीण, भाऊजी हे वैष्णोदेवी मंदिरास भेट देण्यासाठी गेले आहेत़ वैष्णोदेवी मंदिरास जाताना पर्वत चढताना भाऊजींच्या छातीत वेदना अन् कळा येण्यास सुरुवात झाली. त्यांना तातडीने जम्मू येथील एका हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले़ त्याची बहीण ही घाबरलेली असून, तिथे कोणीही परिचयाचे नाही. आम्हास चिंता लागली आहे, तेथील परिस्थिती अन् भाऊजींची प्रकृती कशी आहे? त्याने विनंती केली की, परिचयाचे कोणी मित्र तेथे असतील तर मदत मिळावी.
जम्मूतील उधमपूर येथे मी रोटरीच्या माध्यमातून ५ दिवस मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, माझी दोन व्यक्तींबरोबर मैत्री झालेली़ मी या दोन्ही व्यक्तींना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली. त्यांनीही त्यांचा मोबाईल नंबर मेसेज करण्यास सांगितले. अगदी २० मिनिटांनीच जम्मूतील मित्राचा फोन आला की, काही वेळातच तेथील विभागीय रोटरी सहा़ प्रांतपाल आणि रोटेरियन हे हॉस्पिटलमध्ये पोहोचतील. पाच मिनिटांत मला तेथील सहा़ प्रांतपाल यांचा फोन आला़ ते मित्राच्या भाऊजींजवळ उभे असून, रुग्णांवर उपचार करणारा डॉक्टरसुद्धा रोटेरियन आहे आणि त्याच्याशी बोला, असे म्हणाले. मी त्या डॉक्टरांकडून सर्व माहिती विचारून घेतली. मित्राच्या भाऊजींना हलकासा हार्ट अटॅक आला असून, त्यांच्यावर योग्य उपचार चालू आहेत आणि पुढील उपचारासंदर्भात ते माझ्या संपर्कात राहतील. मी या गोष्टी मित्राला सांगण्यापूर्वी त्यांना बहिणीचा फोन येऊन गेला होता. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने धन्यवाद मानले. - डॉ. व्यंकटेश मेतन(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ आहेत)