साेलापूर : भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशाेक निंबर्गी यांनी रविवारी प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या उपस्थितीत काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. साेलापुरातील शेकडाे भाजप कार्यकर्त्यांची पक्षामध्ये घुसमट हाेत आहे. आमच्यापेक्षा १०० पटीने जास्त घुसमट खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांची हाेत आहे असा दावा प्रा. निंबर्गी यांनी केला.
काॅंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रा. अशाेक निंबर्गी यांनी काॅंग्रेस नेत्यांसमाेर मनातील भावना व्यक्त केल्या हाेत्या. साेमवारी यातील अनेक मुद्ये सविस्तरपणे सांगितले. त्यांच्या टीकेचा राेख आमदार विजयकुमार देशमुख यांच्याकडे हाेता. निंबर्गी म्हणाले, मी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची विचारधारा आणि आणि अडवाणी यांचे नेतृत्व पाहून काम सुरू केले. गेल्या अनेक वर्षे जाेपासलेली ही विचारधारा गेल्या सात वर्षांत शाेधूनही दिसत नाही. भाजपमध्ये असंख्य लाेकांची घुसमट सुरू आहे. साेलापूर भाजपमधील एकाधिकारशाहीला विराेध केला पाहिजे म्हणून शेवटी मनाचा निर्णय केला. भाजपची महापालिकेची सत्ता आली. त्यावेळी आमदारांच्या मनाविरुद्ध महापाैर बसला.
आपल्या समाजातील महिला माेठी झाली तर कदाचित पुढे आमदारकीच्या स्पर्धेत येईल असे वाटू लागले. जनसेवा बाजूला राहिली. एकाच आडवा आणि दुसऱ्याचं जिरवा अशी स्पर्धा सुरू झाली. पावलापावलांवर साेलापूरच्या प्रथम नागरिकाचा अपमान झाला. माझ्या १०० पटीने जास्त घुसमट विद्यमान खासदारांच्या मनात आहे. विद्यमान खासदारांना निधी देण्याचा अधिकार आमदारांनी ठेवलेला नाही. कशासाठी या फंद्यात पडलाे, अशी त्यांची भावना आहे. पुन्हा ते निवडणुकीला सामाेरे जातील असे वाटत नाही, असेही निंबर्गी म्हणाले.