सोलापूर: ठेव रकमा परत मिळण्यासाठी करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅकेच्या ठेवीदारांनी सोमवारी चक्क करमाळा पोलिस स्टेशन समोर ठिय्या मारून लक्ष वेधले. बँकेचे प्रशासक व जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांनी रिजर्व्ह बॅकेच्या अधिका-यांशी बोलून ठेवीदारांना अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर यांनी पोलिस निरीक्षक दालनात प्रा.रामदास झोळ, प्रा. गोवर्धन चवरे, ठेवीदार प्रतिनिधी आणि बॅंकेचे प्रशासक तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांच्यात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. बॅंकेच्या वतीने प्रशासक डोके यांनी रिझर्व्ह बँकेच्या तरतूदीनुसार ठेवी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण नुसती आश्वासने नकोत बॅंकेवर ग्राहकांच्या ठेवींसाठी सुरक्षा कायदयानुसार कारवाई करून तात्काळ ठेवी मिळवून देण्याचा आग्रह धरला.
यावेळी मागील कालावधीत ठेवीदारांचे विम्याचे फॉर्म भरून ते जाणिवपूर्वक जमा न केल्याचा आरोप करत ठेवीदार महिला आक्रमक होऊन डोके यांना घेरले. काहींनी दवाखाना, मुलांचे शिक्षण, शुभकार्येसाठी रक्कम गरजेची असल्याचा टाहो फोडला. यावेळी उडालेला गोंधळ लक्षात घेऊन पोलिस उपनिरीक्षक माहूरकर यांनी प्रा. झोळ, प्रा. चवरे, ठेवीदार प्रतिनिधी आणि बॅंकेचे प्रशासक डोके यांच्यात पुन्हा बंद खोलीत चर्चा घडवून आणली. यावेळी ठेवी परत मिळण्यासाठी प्रा. झोळ यांनी डोके यांना रिझर्व्ह बँकेच्या अधिका-यांना फोन करून पुढील कार्यवाही सबंधी माहिती घेण्याची विनंती केली.