सोलापूर : वारंवार आवाहन करून देखील वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या २५ दिवसांमध्ये १ हजार ८६३ अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३२३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे ५० कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी सोलापूर जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २६) व रविवारी (दि. २७) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीज बिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरू आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात प्रामुख्याने घरगुती २ लाख २७ हजार ३३७ ग्राहकांकडे ३९ कोटी १३ लाख रुपये, वाणिज्यिक १९ हजार २४७ ग्राहकांकडे ७ कोटी ७० लाख रुपये आणि औद्योगिक ३ हजार ७३९ ग्राहकांकडे ३ कोटी ८५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे गेल्या २५ दिवसात १ हजार ८६३ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.