सोलापूर: करमाळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शुक्रवारी तुरीला उच्चांकी १०,०६६ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी केले दिली. शुक्रवारी करमाळा येथे पांढऱ्या तुरीची तब्बल २००० कट्टे आवक झाली. १० हजार ६६ रूपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला असून सरासरी ९८०० रुपये दर मिळाला आहे. त्याचबरोबर ज्वारीला कमाल ५४८१ रुपये तर सरासरी ४२०० रुपयांचा दर मिळाला आहे. हरभ-याला कमाल ५००१ आणि सरासरी ४८५१ रुपये दर मिळाला आहे.
करमाळा बाजार समितीचा गेली ७५ वर्षापासून भुसार शेतमाल विक्रीसाठी विश्वसनीय बाजार पेठ म्हणून आसपासच्या पाच जिल्ह्यात लौकिक आहे. शेतकऱ्यांसमक्ष उघड लिलाव, २४ तासात मापे व मालविक्रीची पट्टी मिळत असल्यामुळे करमाळ्यात तूर, ज्वारी, उडीद, हरभरा, मका, बाजरीची आवक मोठ्या प्रमाणात होते. चालू हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा जादा दर मिळत असून शेतक-यांनी शेतमाल विक्रीस आणाण्याचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केले आहे.