सोलापूर : नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे मागासवर्गीय तरूणाचा निघृण खून केल्याच्या निषेधार्थ, युवा भिमसेना सामाजिक संघटनांच्या वतीने बांगडी चोळीचे आंदोलन केले. दरम्यान 'सीआयडी' ची चौकशी लावण्याची मागणी केली.
जिल्हा परिषदे समोरील पुनम गेट समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाचा निषेध करीत समोर बांगडी व चोळी ठेवली होती. महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. सातत्याने अशा घटना घडत असून हे सरकार मागासवर्गीयांचे संरक्षण करू शकत नाही. मागासवर्गीयांबाबतची न्याय व्यवस्था ढासळत आहे. नांदेड मधील अक्षय भालेराव या तरूणाच्या खूनाची घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. इतकी गंभीर घटना घडलेली असतानाही मुख्यमंत्र्यांनी कुटूंबियांची भेट घेतली नाही.
देशाला स्वातंत्र मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्स साजरा करत असताना दुसरीकडे याच देशाती जातीवाद अद्याप संपला नाही. नांदेड येथील तरूणाच्या हत्येची सीआयडी चौकशी करण्यात यावी. हत्या झालेल्या मागासवर्गीय तरूणाच्या कुटूंबियांना पोलिस संरक्षण देण्यात यावे. पिडीत कुटूंबियांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे यांनी केली.
यावेळी नागा आडसूळ, सुरेश पाटोळे, लखन भंडारे, दिलीप कांबळे, राम कांबळे, वैशाली डोलारे, नेता बनसोडे, विलास साठे, सुनील काळे, लैला जमादार, शाहीन तांबोळी, मल्लू कांबळे, सुभाष मुळीक, महेश तेली, शुभम कटारे, रोहित धोत्रे, प्रकाश गायकवाड व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.