सोलापूर: आषाढी वारीमध्ये भेसळयुक्त पेढा विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांसह पाचजणांवर अन्न औषध प्रशासनाच्या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. त्यांच्याकडून १५० किलो ६० हजार रुपयांचा पेढा जप्त करण्यात आला.
पंढरपूर येथे आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो भाविक येतात. येथे प्रसाद म्हणून विकल्या जाणाऱ्या पेढ्यामध्ये भेसळ तपासण्यासाठी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे भगवा चौक, काळा मारुती रोड, पंढरपूर येथे दुपारी १२:१५ वाजता भागप्पा नाथा डांगे (रा. अनंतपूर, ता. अथणी, जि. बेळगावी), भारत गोरख पाटील, (वय- २४, रा.जिरग्याल, ता. जत, जि. सांगली यांच्यासह इतर तीन अनोळखी इसमानी मिळून पिकअप ( केए -७१, १०८२) व एमएच- ४३, बी- ०३६१) या वाहनातून विक्रीस आणलेल्या पेढ्याचा संशय आला. पथकाने या पेढ्यात जागेवर आयोडीन टाकून पाहिले असता त्यात स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ असल्याचे आढळून आले. त्यानंतर पेढ्याचे नमुने घेऊन उर्वरीत ६० हजार रुपये किंमतीचा १५० किलो पेढ्याचा साठा जप्त केला.
त्यामुळे सदर प्रकरणी भागप्पा नाथा डांगे, भारत गोरख पाटील, व इतर तीन अनोळखी इसमांविरुध्द भा. दं. वि. कलम 272 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे चालू आहे.ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे, मंगेश लवटे, महेश मासाळ, नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनल्ली यांच्या पथकाने केली.स्टार्चचे प्रमाण आढळले अधिकसदर पेढा भेसळ युक्त असल्याने जागेवर नष्ट करण्यात आला. सदर पेढा फूड सेफ्टी व्हील्स या फिरत्या प्रयोगशाळेतून तपासणी करून घेतली असता त्यामध्ये स्टार्च असल्याचे स्पष्ट झाले. पथकाकडून पेढ्याची तपासणी करताना सर्वप्रथम त्यावर आयोडिन टाकून पाहिले असता त्यामध्ये स्टार्च या अन्न पदार्थाची भेसळ आढळून आली.