सोलापूर : वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीत मोठया प्रमाणात पाणी दाखल झाले आहे. या अतिरिक्त पाण्यामुळं भीमा नदीला पुराची परिस्थिती निर्माण झाली असून पंढरपुर शहरातील वाळवंटात असलेली मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. शिवाय दगडी पूलही पाण्याखाली गेला आहे.
पंढरपूर आणि सोलापुरात मुसळधार पाऊस नसला तरी साताऱ्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. त्यामुळे नीरेवरील वीर धरणातून मोठा विसर्ग सोडण्यात आला. नीरा नरसिंगपूर येथे नीरा- भीमेचा संगम असल्याने भीमेत नीरा नरसिंगपूरपासून पाणी यायला लागले. त्यामुळे उजनी धरणातून भीमेत विसर्ग सोडला नसला तरी उजनीच्या पुढे निरेच्या संगमापासून नरसिंगपूर येथे भीमेच्या पाण्यात मोठी वाढ झाली ते पाणी पंढरपुरात आज पोचले आणि पंढरपूरचा दगडी पूल पाण्याखाली गेला तर पुंडलिकाचे मंदिरही अर्धे पाण्याखाली गेले आहे.
सतत पाऊस सुरू असल्याने भीमा व सीना नदीला पूर येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील एकशे पाच गावांना पूर सदृशस्थिती निर्माण होणार असल्याची सूचना दिली जात आहे. त्यामुळे नदीपात्रात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी दिली.