सोलापूर : महावितरणने वीज बिलांच्या सुविधांमध्ये आधुनिकता आणली आहे. या आधुनिक सुविधांमुळे वीज बिलाची खूप मोठी रांग कुठे दिसत नाही. घराघरात आता मोबाइल ॲपवरून वीज बिल भरणाऱ्यांची संख्या वाढली असून, जिल्ह्यात ही संख्या २ लाख १२ हजार ७८२ वर पोहोचली आहे. त्यापैकी ७८ हजार ४७६ ग्राहक शहरी आहेत. परिणामत: कर्मचा-यांवरील थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट हलके झाले आहे.
सोलापूर शहरात सात वर्षांपूर्वी वीज बिल भरणा केंद्र सुरू झाले. या केंद्रांवर सुरुवातीला ग्राहकांची गर्दी होऊ लागली. शहरात आजही त्यांची संख्या २८ आहे. या ऑफलाइनच्या मदतीने वीज बिल भरल्यास त्या केंद्र चालकास एका पावतीमागे ५ रुपयांचे कमिशन मिळते.ग्राहक संख्या ११ लाखांवर
सोलापूर जिल्ह्यात वीज वापरात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेतीपंप असे चार वर्ग पडतात. या चारही वर्गाची जानेवारी महिन्यात एकूण ग्राहक संख्या १० लाख ८९ हजार ६६३ वर होती. ती आता ११ लाखांवर पोहोचली आहे. यापैकी ६ लाख २६ हजार ९४२ ग्राहक हे घरगुती ग्राहक आहेत, तर ६३ हजार १० ग्राहक हे व्यापारी आहेत. याशिवाय २४ हजार १८५ ग्राहक हे औद्योगिक आहेत. त्यापैकी ३, ९७ हजार ग्राहक हे पॉवरलूमधारक आहेत, तसेच ३ लाख ६९ हजार ८०८ ग्राहक हे कृषीपंपधारक आहेत.
शहरातील ग्राहकांची संख्या ही ऑनलाइन वीज बिल भरण्यात आघाडीवर आहे. काही ग्राहक ॲपच्या मदतीने, तर काही लोक महावितरणकडून मोबाइलवर आलेल्या एसएमएसमधील मेसेजवरील लिंकवरून वीज बिले भरून वेळ आणि पैशांची बचत करताहेत.- आशिष मेहताशहर अभियंता, महावितरण सोलापूर