विलास जळकोटकर, सोलापूर : शस्त्राचा वापर करुन धमकावणे, खंडणी उकळणे, बेकायदेशीर जमाव जमवून लोकांमध्ये दहशत निर्माण केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी आकाश अनिल मुदगल (रा. सिद्धेश्वर हौसिंग सोसायटी, सिद्धार्थ चौक, सोलापूर) याला एमडीए कायद्यान्वये बुधवारी स्थानबद्धची कारवाई करण्यात आली. त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी नमूद गुन्हेगाराने सदर बझार पोलीस ठाणे, जेलरोड, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांना वेठीस धरुन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली होती.
त्याच्याविरुद्ध घातक शस्त्राचा वापर करुन दगडफेक, खंडणी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवणे असे गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे पोलिसांच्या रेकार्डवर आहेत. त्याच्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याच्या गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अन्वये स्थानबद्धतेचा आदेश देऊन त्याची पुण्याच्या येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.
संधी दिली वाया गेली-
नमूद गुन्हेगार आकाश याला गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी सन २००८ मध्ये कलम १०७ अन्वये, सन २०१९, २०२१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यान्वये कारवाया केल्या होत्या. संधी देऊनही त्याने वाया घालवली. त्याने गुन्हेगारी कृत्य सुरुच ठेवल्याने त्याच्यावर पुन्हा कारवाई करावी लागली.