काशिनाथ वाघमारे, सोलापूर : केवळ आषाढीच नव्हे, तर इतर तीन वारींनाही महाराष्ट्र शासनाने मदत करावी, वारीत येणाऱ्या भाविकाचा मृत्यू नैसर्गिक झाला तरी त्याला मदत द्यावी आणि एकादशीला व्हीआयपी दर्शन पूर्णत: बंद ठेवावे या तीन प्रमुखसह इतर मागण्या अखिल भाविक वारकरी मंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोमवारी केली.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात सुरू असलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी आलेले मुख्यमंत्री शिंदे यांची राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन वारीच्या पार्श्वभूमीवर विविध मागण्या मांडत त्याचे निवेदन दिले.
यंदाही वारी संदर्भात मुख्यमंत्री पंढरपूरला पाहणी दौरा करणार असल्याने अक्षय भोसले महाराज यांच्या मदतीने अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत चवरे महाराज, राष्ट्रीय सचिव ह.भ.प. बळीराम जांभळे आदी पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री यांची ६५ एकर पंढरपूर येथे चर्चा करून वारीसंदर्भात विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी अमोल शिंदे, शिवाजी सावंत उपस्थित होते.
या आहेत मागण्या..
१) पंढरपूर येथील ड्रेनेज व गटारी नदीला मिळतात ते बंद करावेत.
२) वारीला येणाऱ्या भाविकांचा मृत्यू नैसर्गिक जरी झाला तरी त्यांना मदत मिळावी.
३) एकादशीला व्हीआयपी दर्शन पूर्ण बंद करावेत.
४) ६५ एकरांमध्ये कुठलेच शिबिर घेऊ नये. ती जागा फक्त वारकरी दिंडीला राखीव असावी.
५) या आषाढीवारीप्रमाणे इतर तीनही वारीला सरकारने मदत करावी.
६) सर्व वारीला नदीमध्ये वाहते पाणी असावे.
७) अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल कायमस्वरुपी असावेत.